अगदी त्याच्या चित्रपटाच्या यशापयशातही हेच त्या चाहत्यांचे भन्नाट व भरभरुन वाहणारे प्रेम दिसते. २०१५ च्या दिवाळीत प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ बद्दल समीक्षक समाधानी नव्हते याचा चित्रपटाच्या गर्दीवर काहीच परिणाम झाला नाही. जाणकार रसिकही म्हणत होते, हा चित्रपट खास नाही. पण सलमानचे चाहते यातील काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. अहो चित्रपटाने गल्ला पेटीवर शे दोनशे कोटींचा महाविक्रम कधी केला हेच समजले नाही. त्याचे चाहतेही मग या चित्रपटापेक्षा उत्पन्नाची आकडेमोड करीत आपल्या याच हिरोची बाजू घेऊ लागले. हे असे प्रेम कलाकाराची वेगळीच मिळकत ठरावी. यह दिल है मुश्किल व फवाद खानची त्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बाजू घेताच अनेकांना वाटले सलमानच्या लोकप्रियतेला कायमची ओहोटी लागली, तो संपला. वृत्तवाहिन्यांवरील चर्चेचा सूर धूर देखिल सलमानचे काहीच खरे नाही असाच होता. प्रत्यक्षात काही दिवसातच सलमान बीग बॉसचा नवीन मौसम घेऊन आला व त्याचे स्वागतही झाले. प्रसार माध्यमातून सलमान खान विरोधातील सूर त्याचे चाहते तरी गांभीर्यपूर्वक घेत नाहीत असाच निष्कर्ष काढायचा का? उत्तम उदाहरण त्याचे ते महिलांसंदर्भातील वाह्यात वक्तव्य. ‘सुल्तान’च्या पूर्वप्रसिध्दीचा भाग म्हणून मुलाखतीचे वाटप करताना तो म्हणून गेला की या चित्रपटातील कुस्तीची दृश्ये देताना असा दमून जायचो की जणू बलात्कारित स्त्रिची स्थिती….. हे धक्कादायक विधान एका इंग्रजी ऑनलाईनने देताच बघता बघता वादळ निर्माण झाले. चित्रपटाच्या प्रसिद्धी खात्याची पळापळ झाली. सर्वच प्रसार माध्यमातून टीकेची अशी झोड उठली की सलमान व सुल्तान यांचे काहीच खरे नाही असे वातावरण तयार झाले. काहीनी तर आम्ही कधीच अशा नाठाळ व वाह्यात सलमानचा चित्रपट पाहत नाही असे म्हटले. सलमानचे पिता सलीम खान यानी मागितलेल्या माफीवरही सोशल नेटवर्किंग साइटवर भरपूर टवाळी व विनोद झाले. इतका व असा गदारोळ उठून देखील ‘सुल्तान’ २०१६ चा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरलाय. याचाच अर्थ असे वाद व वादळे आणि सलमान खानची लोकप्रियता व चित्रपट हे पूर्णपणे स्वतंत्र विषय आहेत. त्याच्यावर टीका करणारे, भरपूर तोंडसुख घेणारे मसालेदार मनोरंजन हिंदी चित्रपट किती पाहतात असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो अथवा त्याना चित्रपट चालवणारा वर्ग फारसे गंभीरपणे घेत नाही, असे म्हणता येईलही कदाचित! हिंदी चित्रपट स्टारच्या निस्सीम चाहत्यांची मानसिकतेवर कधीच उत्तर नसते वा हिंदी चित्रपट चालवणार्या ‘मास’ची संस्कृती भिन्न व अजूनही दुर्लक्षित आहे असे वाटते. संजय दत्तला मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी अटक होऊनही ‘खलनायक’चे (१९९३) स्वागत जोरदार कसे झाले. सलमान खानबाबत वारंवार वाद होतात तरी त्याची लोकप्रियता कायम कशी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे प्रत्येक प्रेम प्रकरण गाजले. ऐश्वर्या रायला भेटायला तो ‘देवदास’च्याही सेटवर जाई ही खमंग बातमीही लपून न राहिल्याने तर या प्रेम कहानीत बराच रंग आला. पण सलीम जावेद यांच्या पटकथेत शोधावा असा सॉलिड प्रसंग एकदा घडला. भरपूर दारु पिऊन सलमान एकदा रात्रभर ऐशच्या सोसायटीबाहेर बरळत राहिला. प्रेम व्यक्त करण्याची ही पध्दत अफलातून म्हणावी तर ऐशच्या आईने म्हणजे वृंदा रॉय यानी ‘यापुढे ऐश्वर्याचा सलमानशी काहीही संबंध नाही’ असे पत्रकच काढावे याला उत्तम टायमिंग साधणे म्हणावे लागेल. सतत तात्विक गोष्टी करणार्या व त्यातून वेळ काढत सलमानच्या कृत्याबाबत माफी मागून आपल्यातील पित्याचा प्रत्यय देणाऱ्या सलीम खानना देखील अशी कल्पना सुचली नाही.
ऐश्वर्याच्या सोडचिठ्ठीनंतर सलमानने लग्नच न करण्याचा निश्चयच केल्याचे दिसतेय. एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हा पत्रकारांच्या घोळक्यात तो बसला असता ‘तू लग्न कधी करणार’ असा हुकमी प्रश्न त्याला होताच तो चिडत नाही. छान हसून आपली सुटका करून घेतो. तोपर्यंत त्याचा बचाव करायला पीआरओ येतोच. पण फार पूर्वी याच सलमानचे मीडियाशी पटत नव्हते. स्क्रीन साप्ताहिकाने सलमान खानवर बहिष्कार घातला होता. त्याचे एकही छायाचित्र हे प्रतिष्ठीत साप्ताहिक प्रसिद्ध करीत नव्हते. कारण काहीही गरज नसताना त्याने स्क्रीनच्या छायाचित्रकाराला मारले होते. सलमानची तेव्हा मग्रूर अशी प्रतिमा होती. सनम बेवफा चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळेस एका छायाचित्रकाराने सर्वांदेखत त्याला ‘तू बाजूला हो. मला इतरांचा फोटो काढायचाय’ असे म्हटल्याची बातमी गाजली. काही काळानंतर दोन्ही बाजूने या जखमा भरल्या. रेडी चित्रपटापासून सलमान व मीडियात दोस्ती निर्माण झाली. तोपर्यंत माध्यमात व प्रेक्षकात नवीन पिढीही आली होती. काही फरक पडणारच. बीईंग ह्युमन या संस्थेच्या माध्यमातून सलमान भरपूर सामाजिक सेवा करतोय. त्याचे फार्म हाऊस असणार्या पनवेल जवळील आदिवासीबहुल गावाला तो सतत मदत करतो. पाणी टंचाईवर मदत म्हणून त्याने राज्यभर अनेक टँकर पाणी पाठवले. सामाजिक बांधिलकीत तो आदर्श फिल्म स्टार ठरतो. यातून त्याला मिळणाऱ्या सदिच्छाच त्याची अपेक्षित व अनपेक्षित वादळातून सुटका करीत असाव्यात. के. सी. बोकाडिया निर्मित ‘बीवी हो तो ऐसी’ या त्याच्या पहिल्या चित्रपटाचा पाली हिलवरील भल्ला बंगल्यातील मुहूर्त आजही स्पष्ट आठवतोय. तेव्हा सेटवरची रेखा कशी वावरतेय याकडेच लक्ष केंद्रित करून ते कव्हरेज महत्त्वाचे असल्याने तेव्हाचा नवा चेहरा सलमान खानकडे कशाला पाहायला हवे होते. मैने प्यार कियापासून मात्र सगळेच चित्र बदलल्यावर कधी त्याचा वाद तर कधी त्याला शुभेच्छा असा त्याचा प्रवास चाललाय…
– दिलीप ठाकूर
