Aamir Khan 3 Idiots movie : आमिर खानच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे सगळ्यांचा आवडता ‘३ इडियट्स’. या चित्रपटात त्याने साकारलेल्या रँचोची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात आमिर खानसह आर माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर आणि बोमन इराणी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले होते. या चित्रपटाला देशातच नाही तर परदेशातही पसंती मिळाली होती. आजही हा चित्रपट आणि यातील प्रत्येकाच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
‘३ इडियट्स’मधील शाळेला ‘ही’ मान्यता
या चित्रपटातील कलाकारांसह आणखी एक लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे रॅंचोची अर्थात आमिरची शाळा. लेहधील निसर्गरम्य वातावरणात ही शाळा आहे आणि शाळेचं नाव ‘द्रुक पद्मा कार्पो स्कूल’ असं अहे. ‘३ इडियट्स’नंतर ती चांगलीच लोकप्रिय झाली. अशातच आता या शाळेबद्दलची एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या शाळेला नुकतीच सीबीएसईची मान्यता मिळाली आणि ही मान्यता मिळविण्यासाठी शाळेला तब्बल दोन दशके संघर्ष करावा लागला.
शाळेला इतकी वर्षे मान्यता का नव्हती?
२०१९ मध्ये लडाख केंद्रशासित प्रदेश होण्यापूर्वीपासूनच ही शाळा मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करत होती. या शाळेला आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर राज्य शिक्षण मंडळाची म्हणजेच (JKBOSE) ची मान्यता होती. परंतू, शाळेला सीबीएसईकडून मान्यता हवी होती. ती मिळविण्यासाठी स्थानिक सरकारचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) हवे होते. मात्र ते आत्तापर्यंत न मिळाल्यामुळे सीबीएसईची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पण आता, शाळेला सीबीएसईची मान्यता मिळाली आहे.
शाळेत ११-१२ वीचे वर्ग सुरू करण्याची प्रक्रिया सुरु
या शाळेने आता ११ वी आणि १२ वी पर्यंत शिक्षण देण्याची योजना आखली आहे. २०२८ पर्यंत शाळेत ११-१२ वी वर्ग सुरू करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शाळेच्या सीबीएसई या मान्यतेबद्दल प्राचार्या मिंगुर अंगमो यांनी असं म्हटलं की, “आमच्याकडे सर्व आवश्यक सुविधा आणि अध्यापन पद्धती आधीच उपलब्ध होत्या. फक्त जम्मू आणि काश्मीर राज्य शिक्षण मंडळाकडून एनओसी न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली होती. परंतू आता सीबीएसई मान्यता मिळाल्याने आमच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग सोपा झाला आहे.”
दरम्यान, ‘३ इडियट्स’नंतर शाळेला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. जिथे चित्रपटातील एका दृश्यात एका विद्यार्थ्याला विजेचा धक्का बसतो. हे दृश्य आता शाळेच्या ‘आयकॉनिक वॉल’चा एक भाग बनले आहे. पण विद्यार्थ्यांना अडथळा येऊ नये म्हणून २०१८ मध्ये जी भिंत शाळेच्या कॅम्पसमध्ये हलवण्यात आली.