मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा बॉलीवूड अभिनेता म्हणजे आमिर खान. आपल्या चित्रपट आणि त्यातील भूमिकांसाठी तो विशेषत: ओळखला जातो. त्याच्या विविध आणि आशयघन चित्रपटांमधील भूमिकांच्या निवडीबद्दल तो अनेकदा चाहत्यांकडून आणि जाणकारांकडून वाहवा मिळवताना दिसतो. अशातच तो मेघालयमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणी चित्रपट करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील अनेक घडामोडींकडे आमिर बारकाईने लक्ष देत आहे आणि आगामी काळात तो यावर सिनेमा करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. आमिरचा सिनेमा म्हटला की, त्यामागे अनेकदा खूप तयारी आणि अभ्यास असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आमिर राजा रघुवंशी हत्या प्रकरणी सिनेमा करणार असल्याचं कळताच याबद्दल सोशल मीडियासह सर्वच माध्यमांत जोरदार चर्चा झाली.
मात्र, आता या सिनेमाबद्दल एक अपडेट समोर येत आहे, ती म्हणजे आमिर खान असा कोणताही चित्रपट करणार नाहीय. या सगळ्या अफवा आहेत. ही माहिती आमिरने स्वत: दिली आहे. कालपासून (२१ जुलै) काही बातम्यांनधून असा दावा केला जात आहे की, आमिर खान राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे. पण या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर चित्रपट बनवणार असल्याच्या वृत्तांवर आमिर खानची प्रतिक्रिया
राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर चित्रपट बनवणार असल्याच्या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना आमिर खानने बॉलिवूड हंगामाला सांगितले की, “यात अजिबात तथ्य नाही. अशा अफवा कुठून सुरू होतात हेच मला समजत नाही.” त्यामुळे राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर चित्रपट बनणार असल्याचं वृत्त स्वत: आमिरनेच खोडून टाकलं आहे. यात काहीच तथ्य नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, आमिर खानचा नुकताच सितारे जमीन पर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अनेक स्तरातून या चित्रपटाचं कौतुक झालं. प्रेक्षकांबरोबरच राजकीय वर्तुळातूनही या चित्रपटाबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. यात आमिरसह जिनिलीयाही मुख्य भूमिकेत आहे; तिच्या अभिनयाचंही अनेकांकडून कौतुक करण्यात आलं.
यानंतर आमिर आता लवकरच सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर ‘कुली’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसंच तो त्याचं ड्रिम प्रोडेक्ट ‘महाभारत’ या चित्रपटावरही काम करत आहेत. कदाचित हा त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो. याबद्दल त्याने काही दिवसांपुर्वी मुलाखतीतून निवृत्तीचे संकेत दिले होते.