Aamir Khan Names South Actor’s daughter Mira : बॉलीवूड अभिनेता आमिर खानने दाक्षिणात्य अभिनेत्याच्या लेकीचं नामकरण केलं आहे. नामकरण सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याने आमिर खानचे आभार मानले आहेत. नामकरण सोहळ्यासाठी आमिर खान त्याच्या कामातून वेळ काढून हैदराबादला गेला होता.

दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशालच्या बायकोने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्याने लेकीच्या नामकरण सोहळ्याचं आयोजन केलं. यावेळी अभिनेता आमिर खानने खास हजेरी लावली होती. महत्त्वाचं म्हणजे त्यानेच या नवजात बाळाचं नामकरण केलं आहे. आमिरने विष्णू विशालच्या लेकीचं नाव मीरा असं ठेवलं आहे.

विष्णू विशालने यादरम्यानचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावेळी तो, त्याची पत्नी ज्वाला गुट्टा व इतर कुटुंबीय उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये आमिरने मीराला त्याच्या कुशीत घेतल्याचं पाहायला मिळतंय. विष्णू विशालने साध्या पद्धतीने त्याच्या लेकीच्या नामकरण सोहळ्याचं आयोजन केलं होतं.

विष्णू विशालने शेअर केलेल्या पोस्टला खास कॅप्शनही दिलं आहे. “ही आमची मीरा, आमिर खानचे खूप आभार मानतो. तुम्ही आमच्या लेकीच्या नामकरण सोहळ्यासाठी खास हैदराबादला आलात.” पुढे अभिनेत्याने मीरा नावाचा अर्थही सांगितलं आहे. तो म्हणाला, “मीरा म्हणजे प्रेम आणि शांती.” पुढे विष्णू विशाल म्हणतो, “आमिर सरांबरोबर इथपर्यंतचा प्रवास खूप खास होता, थँक्यू आमिर सर आमच्या मुलीला इतकं छान नाव दिल्याबद्दल.”

‘द हिंदू’च्या वृत्तानुसार अभिनेता विष्णू विशाल व आमिर खान यांच्या मैत्रीबद्दल बोलायचं झालं, तर २०२३ मध्ये आमिर खान त्याच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने चेन्नईमध्ये होता. त्यावेळी या दोघांची ओळख झाली. यानंतर दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत या दोघांची पुन्हा भेट झाली. आमिरची लेक आयराच्या लग्नात विष्णू सहपत्नीक उपस्थित होता.

विष्णू विशालच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ‘इदम पोरुल याएवल’ या चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये त्याने अभिनेता विजय सेतुपतीसह काम केलं होतं. यासह अभिनेत्याने ‘गट्टा कुस्ती’, ‘एफआयआर’, ‘कादान’, ‘सिलुक्कुवरुपट्टी सिंगम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर नुकताच त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर आता आमिर खान यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कुली’ या चित्रपटातून झळकणार आहे. यामध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यासह आमिर खान भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या चरित्रपटाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे.