Aamir Khan Reveals That He Never Wanted To Become A Producer : आमिर खान बॉलीवूडमधील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक समजला जातो. अभिनयासह तो एक निर्माता व दिग्दर्शकही आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यातीलच एक म्हणजे आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ हा चित्रपट. परंतु, या चित्रपटाच्या निर्मितीआधी त्याला वडिलांनी मोलाचा सल्ला दिलेला. त्याबद्दल त्याने सांगितले आहे.

आमिर खानचे वडील दिग्दर्शक व निर्माते होते. त्यामुळे आमिरला तो वडिलांप्रमाणे निर्मिती क्षेत्रात कधी पाऊल ठेवणार याबद्दल अनेकदा विचारले जायचे; पण त्याला मात्र याबद्दल भीती वाटायची, असे त्याने सांगितले आहे. आमिरने कोमल नाहटाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.

कधीच निर्माता होणार नाही असं का म्हणालेला आमिर खान?

आमिर खान म्हणाला, “मी माझ्या वडिलांची कारकिर्द पाहिल्यानंतर मला जाणवलं की मला कधीच निर्माता व्हायचं नाहीये. निर्मात्याला सगळ्यात जास्त काम करावं लागतं. तुम्हाला सगळे धोके पत्करावे लागतात आणि तरीसुद्धा तुम्हालाच लोकांकडून सगळ्यात जास्त ऐकावं लागतं. अनेकदा टीम तुम्हाला नीट सहकार्य करीत नाही आणि त्यामुळे माझ्या वडिलांना त्यांचा ‘लॉकेट’ चित्रपट बनवण्यासाठी आठ वर्षं लागली. ते सगळं पाहिल्यानंतर मी ठरवलं की, आता मी अभिनेता झालो आहे. त्यावेळी ‘कयामत से कयामत तक’ला चांगला प्रतिसाद मिळालेला. त्यामुळे आता मी निर्माता होण्याची काहीच गरज नाही.”

आमिर पुढे म्हणाला, “मी पूर्वी खूप मुलाखती दिल्या आहेत, ज्यामध्ये अनेकदा मला तू तुझ्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल कधी ठेवणार आहेस वगैरे विचारलं जायचं. तेव्हा मी म्हणायचो की, कधीच नाही. मी दिग्दर्शक होईन आणि आता मी अभिनेताही आहे. पण, मी कधीच निर्माता होणार नाही. मात्र, जेव्हा मी ‘लगान’ या चित्रपटाची कथा वाचली तेव्हा मला ती खूप आवडलेली; पण मी विचार करीत होतो की, कोण याची निर्मिती करील आणि न्याय देईल. मी दररोज याबद्दल विचार करायचो. गुरु दत्त, बिमल रॉय, के. आसिफ व चेतन आनंद यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळायची की, त्यांनी त्यांना जे हवं होतं, ते सगळं केलं. म्हणून मी स्वत:ची समजूत काढली की, मला या भीतीवर मात करून चित्रपट बनवायला हवा.

‘लगान’साठी आमिर खानला वडिलांनी दिलेला ‘हा’ सल्ला

आमिर खान पुढे म्हणाला, “मी ‘लगान’च्या नरेशनला रीनाला आणि माझ्या आई-वडिलांना आमंत्रित केलेलं. त्यावेळी जेव्हा आशुतोष गोवारीकर चित्रपटाचं नरेशन करीत होते तेव्हाच ते सगळे चित्रपटाबद्दल कल्पना करीत होते. मी रीनाला विचारलं, तर ती म्हणाली, खूप चांगली कथा आहे. मला खूप आवडली. मग मी माझ्या आई-वडिलांना विचारलं आणि तेही तेच म्हणाले. मी माझ्या वडिलांना विचारलं. हे शक्य आहे की, खूपच वेगळं वाटतंय. करता येईल का? तर ते म्हणाले की, चांगली कथा सहज मिळत नाही. त्यामुळे जेव्हा अशी चांगली कथा तुमच्याकडे येते तेव्हा जास्त विचार नाही करायचा.”

आमिर खानने त्यानंतर ‘लगान’ चित्रपटाची निर्मिती केली आणि वडिलांप्रमाणे निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. आजवर आमिरने ‘लगान’बरोबर ‘देली बेली’, ‘जाने तू या जाने ना’, ‘लापता लेडीज’, ‘धोबी घाट’, ‘तारे जमीन पर’, ‘दंगल’, ‘सितारे जमीन पर’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.