Aamir Khan Slams Bollywood Celebrity : आमिर खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेकदा तो इंडस्ट्रीतील कलकार, चित्रपट, तसेच इतर काही गोष्टींबद्दल प्रतिक्रिया देत असतो. अशातच आता त्यानं बॉलीवूडमधील कलाकार सेलिब्रिटी असल्याचा गैरफायदा घेत असल्याचं म्हटलं आहे.

बॉलीवूडमधील कलाकारांचं वाढतं मानधन, त्यांच्या अत्याधिक मागण्या विशेषतः अशा काळात जेव्हा अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरत आहेत. काही कलाकार कोट्यवधी रुपये फी घेत असल्याच्या, २० जणांच्या टीमबरोबर येत असल्याच्या आणि वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक व्हॅनिटी व्हॅन्स मागत असल्याच्या बातम्या चर्चेचा विषय ठरत आहेत. काही जण यासाठी कलाकारांना दोष देतात, तर काही जण कॉर्पोरेट स्टुडिओजना अशा गोष्टींना प्रोत्साहन दिल्याबद्दल जबाबदार ठरवत आहेत. अशातच आता आमिर खाननं यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आमिर खाननं कोमल नाहटाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “मी जेव्हा इंडस्ट्रीत आलो तेव्हा अशी पद्धत होती की, जेव्हा एखादा सेलिब्रिटी यायचा तेव्हा निर्माता त्याच्या स्पॉट बॉयला, त्याच्या ड्रायव्हरला पैसे द्यायचा. मला वाटायचं की, जर ड्रायव्हर आणि स्पॉट बॉय माझ्यासाठी काम करीत आहेत तर मग निर्मात्याने त्यांना पैसे का द्यावेत?”

आमिर खान पुढे म्हणाला, “मी खूप स्वतंत्र माणूस आहे. निर्मात्यानं माझ्या स्टाफला पैसे द्यावेत हे मला पटत नाही. कारण- याचा अर्थ असा होतो की, मग निर्माता माझ्या मुलांच्या शाळेची फीसुद्धा भरेल. हे कधी थांबणार? निर्मात्यानं चित्रपटाला जेवढी गरज आहे तितकेच पैसे खर्च केले पाहिजेत. त्यांनी मेकअप मन, हेअर ड्रेसर, कॉस्च्युमवाला हे चित्रपटाचा भाग असतात, तर त्यांना पैसे दिले पाहिजेत. पण, एखाद्या निर्मात्यानं माझ्या ड्रायव्हरला किंवा स्पॉट बॉयला पैसे का द्यावेत? ते माझ्यासाठी काम करीत आहेत.”

बॉलीवूड सेलिब्रिटींबद्दल आमिर खानची प्रतिक्रिया

आमिर खान पुढे म्हणाला, “निर्माते हल्ली कलाकाराच्या ड्रायव्हरचा महिन्याचा पगारही देत आहेत. त्यांच्यासाठी चहा, कॉफी आणणाऱ्या माणसाचे, त्यांच्या खासगी स्वयंपाक्याचे पैसेही देत आहेत. काही जण सेटवर कुकिंग व्हॅन, जिमची व्हॅन आणतात आणि निर्माता त्याचेही पैसे देतो. जर एखादा कलाकार कोट्यवधींमध्ये पैसे कमवत आहे, तर मग तो स्वत:च्या गोष्टींचा खर्च उचलू शकत नाही का? कलाकारांनी चित्रपटासाठी ओझं नाही ठरले पाहिजे.”

आमिर खान पुढे स्वत:चं उदाहरण देत म्हणाला, “मी जेव्हा पैलवानकीवर आधारित चित्रपट केला तेव्हा त्यासाठीचं प्रशिक्षण मला निर्मात्यानं दिलं होतं; पण म्हणून त्यांनाच तुमच्या शेफचे पैसे द्यायला लावायचे का? त्याला काहीही अर्थ नाही. जर तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत, तर तुम्ही स्वत:साठी खर्च करा ना? कोणी अडवलं आहे तुम्हाला; पण चित्रपटाच्या निर्मात्याला का पैसे भरायला लावता?”

अभिनेता पुढे म्हणाला, “जेव्हा मी माझ्या कुटुंबीयांना आउटडोअर शूटला घेऊन जातो तेव्हा मी आजवर एकदाही निर्मात्याला त्यासाठी पैसे खर्च करायला लावले नाहीयेत. मी स्वत:चे पैसे वापरले आहेत. हल्ली सेलिब्रिटी प्रसिद्धीचा गैरफायदा घेत आहेत. मला हे खूप विचित्र वाटतं. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की,आजही कलाकार निर्मात्याबरोबर खूप चुकीचं वागतात.”