Abhishek Bachchan Moves Delhi High Court : सोशल मीडियासह सर्वत्र सध्या AI ची क्रेझ आहे. अनेक जण याचा वापर करताना दिसतात. त्यामार्फत अनेकदा फेक व्हिडीओ वगैरे बनवले जातात. विशेषकरून कलाकारांचे AI मार्फत फेक व्हिडीओ बनवले जातात आणि ते अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही जण याकडे दुर्लक्ष करतात; तर काही प्रतिक्रिया देत तक्रार करतात.
नुकतच अभिनेत्री ऐश्वर्या रायनेही या संदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली. तिचे AI द्वारे आक्षेपार्ह फोटो तयार करून त्यांचा उपयोग व्यावसायिक पद्धतीने केला जात आहे. त्यामुळे आपल्या व्यक्तिगत ओळख अधिकाराचं हनन होत आहे, असे तिने उच्च न्यायालयात सांगितले. अभिनेत्रीला न्यायालयाने दिलासादेखील दिला आहे. अशातच आता तिच्यानंतर तिचा नवरा व बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चननेही दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने बुधवारी (१० सप्टेंबर) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून, आपल्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्त्व अधिकारांचे संरक्षण मागितले आहे. त्याने न्यायालयाकडे विनंती केली आहे की, वेबसाइट्स आणि इतर प्लॅटफॉर्म्सनी त्याच्या प्रसिद्धीचा, व्यक्तिगत ओळख अधिकाराचा, फोटोंचा चुकीचा वापर करू नये.
न्यायालयात काय घडलं?
न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी अभिषेक बच्चन यांच्या वकिलांना न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आणि नमूद केले की, ही बाब दुपारी २:३० वाजता ऐकवली जाईल.
अभिषेक बच्चन यांचे वकील प्रवीण आनंद यांनी सांगितले की, अभिषेक बच्चन यांचे एआयनिर्मित व्हिडीओ तयार केले जात आहेत, त्यांच्यी स्वाक्षरी केलेल्या बनावट छायाचित्रांचे प्रसारण करीत आहेत.
पीटीआयच्या माहितीनुसार न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्यासमोर ही बाब दिवसभरात पुढे ऐकवली जाणार होती. अभिषेक बच्चन यांनी ‘बॉलीवूड टी शॉप’ या वेबसाइटविरोधात याचिका दाखल केली आहे, जी बॉलीवूड सेलिब्रिटींचे फोटो असलेले टी-शर्टस तयार करते.