इस्रायल व हमास यांच्या दरम्यान मागच्या १९ दिवसांपासून युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक लोक जखमी आहे. हमास व इस्रायल यांच्यातील भीषण युद्धादरम्यान कंगना रणौतने भारतातील इस्रायलच्या राजदुतांची भेट घेतली आहे.
कंगना रणौतने लिहिलं, “इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांच्याशी भेट झाली. सध्या संपूर्ण जग, विशेषत: इस्रायल आणि भारत दहशतवादाविरुद्ध युद्ध लढत आहेत. काल जेव्हा मी रावण दहनासाठी दिल्लीला आले, तेव्हा मला वाटले की मी इस्रायल दूतावासात यावे आणि आजच्या आधुनिक रावणाचा आणि हमाससारख्या दहशतवाद्यांचा पराभव करणाऱ्या लोकांना भेटावे. ज्या प्रकारे लहान मुलं आणि महिलांना लक्ष्य केले जात आहे ते हृदयद्रावक आहे. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात इस्रायलचा विजय होईल, अशी मला पूर्ण आशा आहे. त्यांच्याबरोबर मी माझा आगामी चित्रपट ‘तेजस’ आणि भारताचे आत्मनिर्भर लढाऊ विमान तेजस याविषयी चर्चा केली.”
नाओर गिलॉन यांनीही कंगनाबरोबरच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. त्यांनी लिहिलं, “कंगना रणौत यांना भेटून खूप छान वाटले. त्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी दिल्लीत होत्या. यावेळी त्यांनी इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी आमच्या दूतावासाला भेट दिली. दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढ्यात दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी फक्त त्यांचेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या भारतीय मित्रांचेही मनापासून आभार मानले.”
दरम्यान, इस्रायलने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने सोमवारी गाझा पट्टीवर ४०० हवाई हल्ले केले, त्यामध्ये हमासचे कमांडर मारले गेले तसेच दहशतवाद्यांच्या तळाचे नुकसान झाले. तर त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे सोमवारी ३२० हवाई हल्ले करण्यात आले होते. पॅलेस्टाईनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बरेच हवाई हल्ले निवासी इमारतींवर करण्यात आले.