विवेक ओबेरॉयने २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्याचं अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडण्यात आलं. शेवटी ब्रेकपॅचअपच्या जाळ्यात अडकलेल्या विवेकने २०१० मध्ये प्रियांका अल्वाशी लग्नगाठ बांधली. सध्या पत्नी आणि त्याच्या दोन मुलांसह अभिनेता आनंदी आयुष्य जगत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.
युट्यूबर अनस बुखाशसह संवाद साधताना विवेक म्हणाला, “एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं की, मी त्याला मनापासून जीव लावतो. मी कधीच कोणालाही फसवलं नाही. आज वचन देऊन उद्या मी ते मोडेन असा माझा स्वभाव अजिबातच नाहीये. फक्त मी स्पष्ट बोलतो. माझ्या अनेक नाममात्र एक्स गर्लफ्रेंड्स आमच्या लग्नालादेखील आल्या होत्या.”
विवेक पुढे म्हणाला, “मला अजूनही आठवतंय २००९ मध्ये मी गोव्याला गेलो असताना ३१ डिसेंबरला माझी आणि एका आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मॉडेलशी भेट झाली. कोणतेही कमिटमेंट न देता चार दिवस आम्ही एकमेकांबरोबर राहिलो. खूप वेळ पार्टी करून मी झोपलो त्यानंतर सकाळी उठल्यावर मला तिचं नाव आठवत नव्हतं. त्या क्षणी मी प्रचंड घाबरलो…मला एकटेपणा जाणवत होता. त्या मुलीकडे जाऊन मी आमचं जे काही नातं होतं ते संपवलं. या सगळ्या गोष्टींमधून मला बाहेर पडायचं होतं.”
विवेक त्याच्या पत्नीबद्दल सांगताना म्हणाला, “गोव्यात घडलेल्या त्या घटनेनंतर ६ महिन्यांनी ४ जुलैला माझी आणि प्रियांकाची भेट झाली. तिला भेटल्यावर आपण या मुलीशी लग्न करू शकतो याची जाणीव मला झाली होती. आज आम्ही १३ वर्ष एकत्र आहोत पण, एकदाही लग्नाच्या निर्णयाचा मला पश्चाताप झालेला नाही. हा प्रवास खरंच सुंदररित्या सुरू आहे.”