अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या ‘तरला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘गॅन्ग्ज ऑफ वासेपूर’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या हुमाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयाबरोबरच हुमा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. अनेकदा हुमाला तिच्या वजनावरून आणि शरीरावरुनही बऱ्याचदा हिणवलं गेलं. एका मुलाखतीत हुमाने तिला आलेल्या बॉडी शेमिंग घटनेबाबत वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा- Video: टोमॅटो महागल्यानं राखीनं उचललं ‘हे’ पाऊल; म्हणाली, “आता सात जन्म…”
बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत हुमाने बॉलीवूडमधील तिच्या सुरुवातीच्या काळातील एक घटना सांगितली आहे. हुमा म्हणाली, “मी २० वर्षांची असल्यापासून इतरांनी माझ्या शरीरावर टिपण्णी केलेली मी ऐकली आहे. एकदा तर मॅग्झीनच्या मुख्य पानावर माझा फोटो पाहून काहींनी नाही नाही ते कमेंट केल्या होत्या. तसेच माझ्या कपड्यांवरही वाईट कमेंट यायच्या. अनेकांनी माझा फोटो झूम करून बघितला आहे. एवढंच नाही तर फोटोमध्ये माझ्या शरीराच्या काही भागांवरती गोल चिन्ह बनवून तो बघितला जायचा आणि इतरांना शेअरही केला जायचा.”
हुमा पुढे म्हणाली, “लोकांनी मला अनेकदा वजन कमी करण्याचा किंवा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. इतकेच नाही तर एका चित्रपट समीक्षकाने मला सांगितले होते. तूझा चेहरा खूप सुंदर आहे. तू खूप चांगली अभिनेत्री आहे. परंतु मुख्य अभिनेत्री बनण्यासाठी तुझे वजन ५ किलो जास्त आहे. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं आणि मी रडू लागले होते.”