प्रियांका चोप्रा व कंगना रणौत यांच्याबरोबर या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मागील बऱ्याच वर्षांपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सध्या ती तिच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतेय. या अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे.

या अभिनेत्रीचं नाव मुग्धा गोडसे आहे. मुग्धा गोडसेचा आज ३९ वा वाढदिवस आहे. मुग्धा तिचा अभिनय, मॉडेलिंग करिअर आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहते. मुग्धा गोडसेने तिच्या मेहनतीने आणि प्रतिभेने इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान मिळवले आहे. मिस इंडिया सेमीफायनलिस्ट राहिलेल्या मुग्धाच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर एक नजर टाकुयात.

२६ जुलै १९८६ रोजी पुण्यात मुग्धा गोडसेचा जन्म झाला. तिने मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात केली होती. २००२ साली तिने मिस ग्लॅडरॅग्ज मेगा मॉडेलचा खिताब जिंकला होता. यानंतर ती फॅशनविश्वात आली. २००४ मध्ये ती मिस इंडिया स्पर्धेत सेमीफायनलिस्ट होती. यशस्वी मॉडेल असलेल्या मुग्धाने २००८ साली मधुर भांडारकरच्या ‘फॅशन’ सिनेमातून बॉलीवूड पदार्पण केलं.

‘फॅशन’ चित्रपटात प्रियांका चोप्रा व मुग्धा दोघींच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. खऱ्या आयुष्यात मॉडेल असलेल्या मुग्धाने या सिनेमातही मॉडेलचीच भूमिका केली होती. तिची भूमिका प्रेक्षकांना व समीक्षकांना खूप भावली होती. यानंतर मुग्धाने ‘ऑल द बेस्ट’, ‘हिरोइन’, ‘बेजुबान इश्क’ व ‘जेल’ हे चित्रपट केले. पण तिचे बहुतांशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. असं असलं तरी मुग्धाने तिच्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मुग्धा गोडसे तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. मुग्धा बॉलीवूड अभिनेता राहुल देवबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतेय. मुग्धा राहुलपेक्षा १८ वर्षांनी लहान आहे. वयात अंतर असूनही हे दोघे १२ वर्षांपासून एकत्र आहेत. या दोघांनी कधीच आपलं नातं लपवलं नाही. दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो पोस्ट करत असतात.

राहुल व मुग्धा यांना एकत्र १२ वर्षे झाली आहेत. मुग्धाने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. “१२ वर्षे, पण वर्षे कोण मोजतंय” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं होतं.