Samantha Ruth Prabhu Emotional :अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिच्या सौंदर्य आणि अभिनयाद्वारे कायम प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे. केवळ टॉलीवूडच नाही, तर बॉलीवूडमध्येही समांथाची क्रेझ पाहायला मिळते. आपल्या अभिनय आणि सौंदर्यानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री समांथानं नुकत्याच एका कार्यक्रमात तेलुगू लोकांचे आभार मानले आहेत. अमेरिकेतील एका कार्यक्रमात तिनं तेलुगू लोकांचे आभार मानले आणि त्यावेळी तिला अश्रूही अनावर झाले.

समांथा रुथ प्रभूने तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (TANA)च्या २०२५ च्या कार्यक्रमात खास हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या पहिल्याच चित्रपटापासून तुम्ही मला आपलं मानलंत. तुम्ही मला फक्त प्रेम दिलं आहे. या मंचावर येण्यासाठी मला १५ वर्षं लागली, यावर माझा विश्वासच बसत नाही.”

पुढे ती म्हणाली, “माझ्या करिअरला १५ वर्षं झाली असली तरी मला वाटते की, मी माझ्या कारकिर्दीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर इथे आली आहे. माझ्या ‘सुभम’ या चित्रपटावर सर्वांत जास्त प्रेम करणारे आणि त्याचं कौतुक करणारे लोक उत्तर अमेरिकेतील तेलुगू समुदायातील असल्याचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण- या प्रेमाची मला जाणीव आहेच. त्यासाठी मी तुमची खरोखर आभारी आहे.”

समांथा रूथ प्रभूचा एक्सवरील व्हिडीओ

पुढे समांथा म्हणते, “मी उचललेलं प्रत्येक पाऊल आणि मी केलेल्या प्रत्येक चुकीतही तुम्ही माझी साथ सोडली नाहीत. मी त्याबद्दल खरोखर कृतज्ञ आहे. मी कुठेही जाते, मी काहीही करते आणि मी कोणत्याही इंडस्ट्रीत काम करते आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माझ्या मनात येणारा पहिला विचार म्हणजे ‘तेलुगू प्रेक्षकांना माझा अभिमान वाटेल की नाही?’

त्यानंतर समांथा भावूक होत म्हणाली, “आजवरच्या प्रवासात मला पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचेच धन्यवाद. तुम्ही मला कायम एक विशेष ओळख आणि आपलेपणाची भावना दिली आहे.” दरम्यान, समंथाची पहिली निर्मिती असलेला सुभम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रवीण कंदरेगुला दिग्दर्शित या चित्रपटात हर्षित रेड्डी, गविरेड्डी श्रीनिवास, चरण पेरी, श्रिया कोन्थम, श्रावणी लक्ष्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.