मराठीप्रमाणे बॉलीवूड कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून वैदेही परशुरामीला ओळखलं जातं. बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात तिने आकृती दवे ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वैदेहीचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. याशिवाय अभिनेत्रीला एका खास व्यक्तीने फोन केला होता. ती व्यक्ती कोण आहे जाणून घेऊयात…

वैदेही नुकतीच ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये झळकली आहे. या सीरिजच्या निमित्ताने मीडियाशी संवाद साधताना अभिनेत्रीला तुला “आतापर्यंत तुझ्या कामासाठी मिळालेली सर्वात चांगली प्रतिक्रिया कोणती?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर वैदेहीने तिच्या आयुष्यातील एक खास अनुभव सांगितला.

हेही वाचा : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये अमृता फडणवीस आणि रिहानाची ग्रेट भेट; फोटो शेअर करत म्हणाल्या…

वैदेही म्हणाली, “आतापर्यंत मला अनेकांनी कामासाठी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण, या सगळ्यात माझ्या लक्षात राहिलेली एक प्रतिक्रिया होती ती मी नक्कीच सांगेन. ‘सिम्बा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मला खास तब्बूने फोन केला होता. तिच्याशी फोनवर बोलताना मी फक्त रडत होते. माझ्या डोळ्यातून केवळ अश्रू येत होते. कारण, तब्बूच्या कामाची मी खूप मोठी चाहती आहे. ती मला प्रचंड आवडते.”

हेही वाचा : Video : “शरद पवारांच्या वयात स्टेजवर बसलेल्या गावगुंडांची…”, किरण मानेंची सत्ताधाऱ्यांवर टीका; म्हणाले…

“मी जेव्हा पासून इंडस्ट्रीत काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून तब्बू माझ्यासाठी प्रेरणास्थानी आहे. कारण, तिने आजवर ज्या पद्धतीची कामं केली आहेत त्या सगळ्या भूमिका मला प्रचंड आवडल्या. अशातच तिचा फोन आल्यावर मी खूप भावुक झाले. तिने माझ्या कामाचं खूप कौतुक केलं. ही एवढी मोठी गोष्ट मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.” असं वैदेहीने सांगितलं.