शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसचं चित्रच बदलून टाकलं आहे. जगभरात १००० कोटी तर भारतात ५०० कोटीहून अधिक कमाई करत नवे रेकॉर्ड या चित्रपटाने रचले. याबरोबरच ‘यश राज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’लादेखील एक वेगळंच वळण मिळालं. हॉलिवूडची ही संकल्पना सध्या भारतीय मनोरंजनसृष्टीत सर्रास आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला माहितीये का की केवळ यश राजचं हे ‘स्पाय युनिव्हर्स’च नव्हे तर अशी आणखी काही वेगवेगळी युनिव्हर्स आणि त्यातील वेगळे चित्रपट आपल्याला येत्या काळात बघायला मिळणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) कॉप युनिव्हर्स :

दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या ‘गोलमाल’ आणि ‘सिंघम’ या सीरिजमुळे प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या ‘सिंघम’ या चित्रपटाची क्रेझ एवढी वाढली की त्याने या चित्रपटांना एकत्रित करून एक कॉप युनिव्हर्स तयार केले आहे. यात ‘सिंघम’ रणवीर सिंगचा ‘सिंबा’ आणि अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. एप्रिल २०२३ मध्ये रोहित शेट्टी याच युनिव्हर्समधील ‘सिंघम ३’चं चित्रीकरण सुरू करणार आहे, याबरोबरच रोहित प्राइम व्हिडिओच्या एका वेबसीरिजवर सुद्धा याच युनिव्हर्सशी जोडलेलं एक कथानक घेऊन येणार आहे.

आणखी वाचा : प्रियांका चोप्राच्या ‘सिटाडेल’बद्दल मोठी अपडेट; वाचा कधी आणि कुठे पाहायला मिळणार ही वेबसीरिज?

२) प्रशांत नील युनिव्हर्स :

२०१८ मध्ये कन्नड दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ‘केजीएफ चॅप्टर १’ हा चित्रपट काढला. याबरोबरच शाहरुख खानचा ‘झीरो’ प्रदर्शित झाला होता, त्यावेळी ‘केजीएफ चॅप्टर १’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्यानंतर थेट २०२२ मध्ये ‘केजीएफ चॅप्टर २’ने मात्र सगळ्यांना अचंबित करून सोडलं. जबरदस्त कमाई करणाऱ्या या चॅप्टर २ नंतर प्रशांत नील आता याच युनिव्हर्समध्ये आणखी २ चित्रपट काढणार आहेत. त्यापैकी एक प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट आहे तर दुसऱ्या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर झळकणार आहे. प्रेक्षक प्रशांत नीलच्या युनिव्हर्ससाठी चांगलेच उत्सुक आहेत.

३) राज अँड डीके युनिव्हर्स :

राज आणि डीके या दिग्दर्शक जोडगोळीने कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सर्वप्रथम मनोज बाजपेयीची ‘द फॅमिली मॅन’ ही वेबसीरिज आणि आता त्याच युनिव्हर्सशी जोडली जाणारी शाहिद कपूर विजय सेतुपतीची नुकतीच आलेली ‘फर्जी’ ही वेबसीरिज ही याच राज आणि डीके युनिव्हर्समधील आहे. ओटीटी विश्वात राज आणि डीकेने केलेलं काम वाखाणण्याजोगं आहे. आता चाहते याच युनिव्हर्सच्या ‘फॅमिली मॅन ३’ आणि ‘फर्जी’च्या पुढील सीझनची आतुरतेने वाट बघत आहेत.

४)हॉरर कॉमेडी युनिव्हर्स :

मॅडडॉक फिल्म्सचे कर्ताधर्ता दिनेश विजन यांनी सर्वप्रथम ‘स्त्री’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट काढला आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. त्यानंतर याच युनिव्हर्सशी आणखी दोन चित्रपट जोडले गेले ते म्हणजे ‘रूही’ आणि ‘भेडीया’. आता या युनिव्हर्समध्ये आणखी एका नव्या चित्रपटाची एन्ट्री होणार आहे शिवाय ‘स्त्री २’साठीसुद्धा प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After pathaan huge success indian audience is excited for more cinematic universe avn