गुरुवारी, १२ जून रोजी गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच हे AI171 हे विमान हॉस्टेलवर कोसळलं आणि दुर्दैवी दुर्घटना घडली. या विमानात २४२ लोक होते, ज्यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. या घटनेनंतर बॉलीवूडच्या शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, आलिया भट्ट, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट, करीना कपूर, वरुण धवन, जान्हवी कपूर, विकी कौशल आणि अशा अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं.

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटद्वारे याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमिताभ यांनी मोजक्या शब्दांत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते असं म्हणतात, “टी ५४१० – हे भगवान! हे भगवान! हे भगवान! स्तब्ध! सुन्न! ईश्वर कृपा! हृदयसे प्रार्थना!” त्यांची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. तसंच अमिताभ यांच्या पोस्टवर अनेक नेटकरीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये अहमदाबाद विमान अपघाताचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. पण या पोस्टमुळे त्यांना नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावं लागत आहे. एकाने या पोस्टखाली कमेंट्समध्ये त्यांना “तुम्ही २४ तास उशिरा आला आहात” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “घटनेच्या धक्क्यामुळे तुम्ही बेशुद्ध पडला होता का सर? कदाचित तुम्हाला आत्ताच शुद्ध आली असेल, म्हणूनच तुम्ही आता ट्विट करत आहात” असं म्हटलं आहे.

पुढे आणखी एकाने “वाह, तुम्हाला श्रद्धांजली वाहण्यासाठी इतका वेळ लागला” अशी कमेंट केली आहे. दुसऱ्याने “कधी कधी वाटतं तुम्ही जाणून बुजून असं वागत आहात” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “अपघात होऊन २४ तास झाले, तुम्ही फक्त दिखाव्यासाठी आता पोस्ट करत आहात? भारतातील लोकांना तुमच्या या पोस्टची गरज नाही” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “आता झोपेतून जागे झाला आहात का?” असं म्हटलं आहे. अशा अनेक नकारात्मक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या एक्स पोस्टवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अनेक नकारात्मक प्रतिक्रियांसह काही नेकऱ्यांनी त्यांची बाजू घेतली आहे आणि त्यांना पाठिंबा दिला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासाठी सोशल मीडियावरील पोस्टमुळे करावा लागणारा टीकेचा सामना काही नवीन नाही. याआधी अनेकदा त्यांना विविध पोस्टमुळे नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहेत. कधी कधी अमिताभ बच्चन या नेटकऱ्यांना त्यांच्या खास शैलीत उत्तरंही देतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी वयावरून ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला होता.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते नुकतेच ‘वेत्तैयन’मध्ये दिसले होते. यानंतर ते आता ‘कल्की २८९८ एडी’चा दुसरा भाग ‘सेक्शन ८४’ आणि ‘ब्रह्मास्त्र भाग २: देव’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसंच या वर्षाच्या अखेरीस ‘कौन बनेगा करोडपती’च्या नवीन सीझनद्वारेही ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जातं आहे.