Mahesh Bhatt Praises Daughter Aliya Bhatt : आलिया भट्ट ही लोकप्रिय दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असली तरी तिला तिच्या वडिलांनी लाँच केलं नव्हतं. दिग्दर्शक व निर्माता करण जोहरनं तिला त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटातून लाँच केलं. त्यानंतर तिनं तिच्या अभिनयाद्वारे अनेकांची पसंती मिळवली. अशातच आता तिचे वडील महेश भट्ट यांनी तिच्या कामाबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

आलिया भट्टनं तिच्या दमदार अभिनय शैलीद्वारे प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केलं आहे. तरीसुद्धा काही वेळा नेपोटिझम हा मुद्दा वर येताना दिसतो. अशातच आता अभिनेत्रीच्या कामाबद्दल स्वत: तिचे वडील आणि दिग्दर्शक, निर्माते महेश भट्ट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘द हिमांशु मेहता शो’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लेकीच्या कामाबद्दल सांगितलं आहे.

महेश भट्ट लेक आलियाबद्दल काय म्हणाले?

महेश भट्ट लेकीबद्दल म्हणाले, “ती स्वावलंबी आहे. मी तिला लाँच केलेलं नाही. करण जोहरनं तिला इंडस्ट्रीत लाँच केलं. मला माहीतही नव्हतं की, तिच्यामध्ये अभिनयाची एवढी भूक आहे की, ती स्वत: ऑडिशन द्यायची. मला फक्त एवढंच कळायचं की, त्यांना तिचं काम आवडत आहे. मला खरं तर धक्का बसला होता; कारण- मी तिच्यामध्ये असे कुठलेही गुण पाहिले नव्हते. मला खूप आनंद आहे की, तिनं स्वत:च्या बळावर नाव कमावलं आहे.”

महेश भट्ट यांनी पुढे सांगितलं की, तरुण मुलं त्यांच्यासह फोटो काढतात. कारण- ते आलिया भट्टचे वडील आहेत. ते म्हणाले, “आलियानं मला चकित केलं आहे. तिच्याबद्दलचं वेगळेपण हे आहे की, तिनं कायम आव्हानात्मक काम केलं आहे.”

आलिया भट्टमध्ये तिच्या लेकीच्या जन्मानंतर बदल झाल्याचं महेश यांनी म्हटलं आहे. लेक व नातीबद्दल महेश म्हणाले, “राहाच्या जन्मानंतर मी तिच्यामध्ये झालेले बदल पाहिले आहेत. ती अधिक गंभीर आणि खूप समजूतदार झाली आहे. मीसुद्धा तिच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत आहे.”

आलियाबद्दल महेश भट्ट पुढे म्हणाले, “रणबीरलासुद्धा तिच्या कामाचं कौतुक आहे. तो म्हणतो की, आलिया वेगळीच आहे. जेव्हा मी त्याला म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे, असं विचारलं तेव्हा तो म्हणाला, तिला सतत काही न काही करण्याची इच्छा असते. त्याउलट तो असा माणूस आहे की, जो समाधानी आणि गरजेपुरतंच काम करतो.”

महेश भट्ट पुढे नेपोटिझमबद्दल म्हणाले, “नेपोटिझम हे सत्य आहे; पण प्रत्येक वेळी तसं नसतं. आलिया व रणबीर दोघेही हुशार कलाकार आहेत. नेपोटिझम असलं तरी जर माझ्या मुलांमध्ये कौशल्य आहे, तर ते मी नाकारू तर शकत नाही ना. अर्थात, त्यांच्यासाठी थोडं सोपं आहे हे. कारण- संधी मिळणं फार महत्त्वाचं असतं. असे कितीतरी कलागुणांनी संपूर्ण लोक आहेत, ज्यांना वर्षानुवर्ष संधी मिळत नाही. त्यामुळे नेपोटिझमबद्दल वारंवार बोललं जातं; पण हा मुद्दा नीट समजून घेतला पाहिजे.”