फराह खान तिच्या युट्यूब व्लॉगमधून अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घराची झलक दाखवते. नुकतीच ती तिच्या घरी काम करणाऱ्या दिलीपला घेऊन अभिनेत्री अमीषा पटेलच्या घरी पोहोचली. फराहने व्हिडीओत अमीषाच्या लक्झरी बॅग कलेक्शनची झलक दाखवली. अमीषाला बॅग्जची प्रचंड आवड आहे. तिच्याइतक्या डिझायनर बॅग्ज इतर कोणत्याच सेलिब्रिटीकडे पाहिल्या नसल्याचं फराह म्हणाली.

आपल्याजवळ तब्बल ३०० ते ४०० लक्झरी बॅग्ज असल्याचं अमीषाने सांगितलं. तसेच क्लच व बेल्ट बॅग्जही आहेत. अमीषाला महागड्या घड्याळांची आवड आहे. अमीषाचं एक कपाट बिरकिन बॅग्जने भरलं आहे. बिरकिन जगातील सर्वात एक्स्लुसिव्ह ब्रँड्सपैकी एक आहे. त्यांच्या एका बॅगजी किंमत दोन ते तीन कोटी असते.

अमीषाने कोणत्या कपाटात कोणत्या लक्झरी बॅग्ज ठेवल्यात याची यादी तयार केली आहे. ज्यामुळे तिला हवं ती बॅग्ज शोधणं जास्त सोपं जातं. अमीषाची एक बॅग पाहून फराहने म्हटलं की ही बॅग तिला खूप दिवसांपासून घ्यायची होती, पण ते शक्य झालं नाही.

बॅग्ज नसत्या तर पेंट हाऊसची मालकीण असती अमीषा

फराहला तिच्या बॅग्ज व शूज कलेक्शनची झलक दाखवताना अमीषा गमतीत म्हणाली, “मला बॅग्ज गोळा करायची सवय नसती तर मी मुंबईत पेंट हाऊसची मालकीण असते.”

५.८ लाखांची बॅग

अमीषाने तिची Andiamo Large Tote बॅग दाखवली. ते पाहून फराह गमतीत म्हणाली, “याला दाखवू नकोस, तो यात भाजीपाला आणेल.” अमीषाकडील बॅग्ज मोठ्या असतात त्यामुळे त्या भाजीपाला आणायला वापरल्या जातात, असं बरेच जण म्हणतात. या बॅगची किंमत ५ लाख ८० हजार रुपये असल्याचं अमीषाने सांगितलं.

अमीषाला फक्त बॅगचीच नाही तर शूजची देखील आवड आहे. तिच्याकडे लाल, सोनेरी, निळे, हिरवे आणि सिल्व्हर अशा रंगाचे शूज आहेत. तिचे सर्व शूज गूची व लुई विटॉनचे आहेत. तिच्या प्रत्येक शूजची किंमत १ लाखांहून जास्त आहेत, असं तिने नमूद केलं.

लिमिटेड एडिशन बॅग्ज

अमिषाकडे डियोर, प्राडा, गुची आणि एलव्हीच्या लिमिटेड एडिशन बॅग्ज देखील आहेत. ९०% बॅग्ज क्लासिक नाहीत, फक्त काही बेसिक बॅग्ज रोजच्या वापरासाठी आहेत. भारत, दुबई, पॅरिस किंवा लंडनमध्ये, नवीन बॅग्ज लाँच झाल्यावर डिझायनर्स तिला फोन करतात, असं ती सांगते.

इतर महागड्या बॅग्ज

अमिषाकडे शनेल बॅग्जने भरलेले कपाट देखील आहे. यात किमान ५ लाख ते त्याहून जास्त किमतीच्या बॅग्ज आहेत. तिने पावडर ब्लू आणि ऑरेंज रंगाच्या बिर्किन बॅग्ज देखील दाखवल्या. फराह म्हणाली, “बॉयफ्रेंडला मिठी मारण्यापेक्षा या बॅग्जना मिठी मारणं चांगलंय.” यावर “म्हणूनच माझ्याकडे बॅग्ज आहेत, बॉयफ्रेंड नाही,” असं गमतीत अमीषा म्हणाली.