Amitabh Bachchan : सुपरस्टार, बिग बी, महानायक अशी ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतल्या सुप्रसिद्ध प्रतीक्षा बंगल्यात मुंबईतल्या पावसामुळे झालेल्या पुराचं पाणी शिरलं. या संदर्भातला व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी हा बंगला त्यांची मुलगी श्वेता नंदाच्या नावे केला आहे.
जूहू भागात आहे अमिताभ बच्चन यांचा बंगला
मुंबईतल्या जुहू भागात अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला आहे. या बंगल्याची मालकी आता श्वेता नंदा म्हणजेच अमिताभ यांच्या मुलीकडे आहे. आज याच प्रतीक्षा बंगल्यात पुराचं पाणी गेलं. मुंबईत मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. २४ तासांत ३०० मिमी पाऊस झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज मुंबईतलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहण्यास मिळालं. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साठलं होतं. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यातही पुराचं पाणी शिरलं.
शोले चित्रपटाच्या यशानंतर अमिताभ बच्चन यांनी खरेदी केला प्रतीक्षा बंगला
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळालं. या चित्रपटाने त्या काळात ३५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर अमिताभ बच्चन यांनी प्रतीक्षा बंगला विकत घेतला होता. अमिताभ बच्चन यांनी १९७६ मध्ये हा बंगला विकत घेतला होता. या बंगल्याची सध्याची किंमत ५० कोटींहून अधिक आहे. श्वेता आणि अभिषेक या दोघांचाही जन्म याच बंगल्यात झाला आहे. या बंगल्याचं प्रतीक्षा हे नाव अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी दिलं आहे. सुरुवातीला अमिताभ बच्चन हे त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्यासह या बंगल्यात राहत होते. त्यानंतर बच्चन कुटुंब जलसा या बंगल्यात शिफ्ट झालं. आता याच प्रतीक्षा या बंगल्यात पाणी शिरलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
बंगल्यात पाणी शिरल्याचा व्हिडीओ व्हायरल
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात पाणी शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीक्षा शर्मा या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात पाणी शिरल्याचं दिसतं आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
अमिताभ बच्चन कल्की सिनेमात दिसले होते
अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी कल्की या सिनेमातून दाक्षिणात्य सिनेमातून अश्वत्थामा ही भूमिका केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या या भूमिकेचं चांगलंच कौतुकही झालं. तसंच केबीसी म्हणजेच कौन बनेगा करोडपती या शोमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतातच. अमिताभ बच्चन यांची जादू, त्यांचं गारुड आजही कायम आहे.