Amitabh Bachchan Navy Warship Experience : बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे आपल्या अभिनयाने गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. मनोरंजनाचा छोटा पडदा असो वा मोठी स्क्रीन… सर्व क्षेत्रात त्यांचा मुक्त वावर आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक किस्से, प्रसंग व काही अनुभव शेअर करत असतात.

अमिताभ यांनी नुकतीच भारतीय नौदलाला भेट दिली आणि त्यांनी या भेटीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमिताभ यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर युद्धनौकेवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह त्यांनी भारतीय संरक्षण दलांबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच भारतीय म्हणून अभिमान असल्याचंही ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

या पोस्टमध्ये बिग बी असं म्हणतात, “आपल्या संरक्षण दलांमधील सैनिकांच्या शौर्याच्या आणि त्यागाच्या कथा आपण ऐकतो. पण जेव्हा आपण या सैनिकांना प्रत्यक्ष पाहतो, अनुभवतो, तेव्हा समजतं की, आपण शांत झोपतो, कारण कुणीतरी आपल्या रक्षणासाठी लढत असतं. आपल्या देशाच्या रक्षणासाठीचं सैनिकांचं समर्पण, शिस्त आणि इच्छाशक्ती पाहून मन भारावून जातं. आपण सुरक्षित आहोत; कारण ते आपल्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस झटत असतात.”

यापुढे ते म्हणतात, “मी आज जे पाहिलं, त्यामधून खूप काही शिकलो. काही गोष्टी अशा आहेत; ज्या सर्वसामान्यांना माहितीही नसतात… पण त्या जाणून घेऊन मन अभिमानाने भरून येतं. मी माझा एक दिवस भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर व्यथित केला आणि हा माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव आहे. मी भारत देशाचा नागरिक आहे आणि जे आपल्यासाठी स्वत:चं सर्वस्व देतात, त्यांच्याबद्दल माझ्या मनात अभिमान आणि आदर आहे.”

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीदेखील अमिताभ बच्चन चाहत्यांचं सिनेमांच्या माध्यमातून मनोरंजन करत आहेत.

अशातच ते आता पुन्हा छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘कौन बनेगा करोडपती १७’ हा कार्यक्रम येत्या ११ ऑगस्ट २०२५ रोजी सोनी टीव्हीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यासाठी त्यांचे अनेक चाहते उत्सुक आहेत.