रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीरचे हिंस्त्र रूप बघायला मिळत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर, तृप्ती डिमरी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता ‘अ‍ॅनिमल’च्या सहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘बूट चाटण्याचा सीन, ‘नॅशनल क्रश’ म्हणून मिळालेली ओळख; तृप्ती डिमरीने ‘अ‍ॅनिमल’मधील कामाबद्दल प्रथमच केलं भाष्य

‘अ‍ॅनिमल’ चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. प्रदर्शनाअगोदरच ॲडव्हॉन्स बुकिंगमधून ‘अ‍ॅनिमल’ने मोठी कमाई केली होती. भारताबरोबरच परदेशातही चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. या सहा दिवसांत चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढतच गेल्याचे दिसून येत आहे.

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी ‘अ‍ॅनिमल’ने जगभरात १०० कोटींची कमाई केली होती, तर भारतात या चित्रपटाने ६३.८ कोटींचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या दिवशी ६६.२७, तिसऱ्या दिवशी ७१.४६, चौथ्या दिवशी ४३.९६, पाचव्या दिवशी ३७.४७; तर सहाव्या दिवशी ‘अ‍ॅनिमल’ने ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सहा दिवसांत या चित्रपटाने भारतात ३१२.९६ कोटींचा गल्ला जमवला आहे, तर जगभरात ‘अ‍ॅनिमल’ची कमाई ५०० कोटींपेक्षा अधिक झाली आहे.

कमाईच्या बाबतीत ‘अ‍ॅनिमल’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’, ‘जवान’बरोबरच प्रभासच्या ‘बाहुबली २’ चित्रपटालाही मागे टाकले आहे. ‘पठाण’ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी २५.५ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ‘जवान’ चित्रपटाने सहाव्या दिवशी २४ कोटी रुपये कमावले होते. ‘बाहुबली २’ने सहाव्या दिवशी २६ कोटींचा गल्ला जमवला होता.’ ‘अ‍ॅनिमल’ची कमाई पाहता हा रणबीरच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal movie box office collection day 6 ranbir kapoor boby deol rashmika mandanna film earn 30 crores dpj