Anupam Kher On Tanvi The Great Movie : एकाच दिवशी दोन-तीन सिनेमे जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतात, तेव्हा त्या चित्रपटांचा एकमेकांच्या कमाईवर परिणाम हा होतोच. एका सिनेमाच्या लोकप्रियतेची झळ दुसऱ्या सिनेमाला बसते आणि याचा थेट परिणाम तिकीटबारीवर होतो, असं अनेकदा झालं आहे. सध्या मराठीच्या तीन सिनेमांबाबत हे चित्र पाहायला मिळत आहे. असंच काहीसं बॉलीवूड सिनेमांबाबतही झालं होतं.

जुलै महिन्यात १८ तारखेला एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते, त्यापैकी एक होता अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सैयारा’ आणि दुसरा होता अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ सिनेमा. ‘सैयारा’मुळे अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ सिनेमाला चांगलाच फटका बसला. ‘सैयारा’मुळे ‘तन्वी द ग्रेट’ सिनेमाला काढून टाकण्यात आलं आणि याचबद्दल अनुपम यांनी खंत व्यक्त केली आहे.

‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या अपयशाबद्दल भावना व्यक्त केली. “मी ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटावर चार वर्ष काम केलं. एक वर्ष लेखनासाठी, एक वर्ष संगीतासाठी. लेखन आणि दिग्दर्शन मीच केलं. आम्ही हा चित्रपट याच दिवशी प्रदर्शित केला, ज्या दिवशी यशराज फिल्म्सचा ‘सैयारा’ रिलीज झाला. पण, प्रेक्षकांनी ‘सैयारा’ला अधिक पसंती दिली. मला स्वतःपेक्षा त्या नवोदित अभिनेत्यासाठी आणि त्या २०० लोकांसाठी वाईट वाटलं, ज्यांनी प्रामाणिकपणे या चित्रपटासाठी मेहनत केली होती.”

यापुढे ते म्हणाले, “चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक महिना आधी फायनान्सर पळून गेला, त्यामुळे मला माझ्या काही डॉक्टर, वकील अशा मित्रांची मदत घ्यावी लागली. त्यांनी मला पैसे दिले. सर्व काही ठीक चाललं होतं, पण प्रेक्षकांना एक प्रेमकथाच पाहायची होती आणि त्यात त्यांची काही चूक नव्हती. खूप दिवसांनी अशी तरुणाईची प्रेमकथा आली होती.”

यापुढे अनुपम खेर सांगतात, “आपल्या भारतात अशी व्यवस्था आहे की, जरी तुमचा चित्रपट ४०० चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला असेल आणि दुसरा एखादा चित्रपट हिट झाला, तर तुमचा चित्रपट थिएटरमधून काढून टाकतात, त्यामुळे ही अपयशाची भावना माझ्यासाठी खूपच वेदनादायक होती.”

अनुपम खेर इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, ‘तन्वी द ग्रेट’मधून तन्वी रैना या ऑटिस्टिक मुलीची कथा सांगण्यात आली होती, जी आपल्या दिवंगत वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सियाचिनमध्ये भारतीय ध्वज फडकावण्याच्या उद्देशाने एक कठीण प्रवास करते. हा चित्रपट केवळ ₹२.५४ कोटींचं जागतिक कमाई करू शकला.

तर मोहित सुरी यांच्या ‘सैयारा’ सिनेमातून प्रेमकथा पाहायला मिळाली. सिनेमातील मुख्य नायक आणि नायिकेच्या आयुष्यात एक अशी वेळे येते, जी त्यांना वेगळं करते. मात्र, ते परत एकमेकांपर्यंत कसे पोहोचतात हे चित्रपटाचं मुख्य कथानक होतं. या सिनेमाने तब्बल ५६९.७५ कोटींची कमाई केली.