Anurag Kashyap on Javed Akhtar: अनुराग कश्यप हा असा दिग्दर्शक आहे, ज्याचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. काळाच्या पुढे जाऊन चित्रपट बनवणारा दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपची ओळख आहे.

आता अनुराग कश्यप हा त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने जावेद अख्तर यांच्याबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.

अनुराग कश्यप म्हणाला…

२०१८ मध्ये अनुराग कश्यप दिग्दर्शित मुक्काबाज हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर जावेद अख्तर यांनी काय प्रतिक्रिया दिली होती, याचा त्यांनी खुलासा केला. अनुराग कश्यप म्हणाले, “जावेद साहेबांनी माझा मुक्काबाज हा चित्रपट पाहिला होता. चित्रपट संपल्यानंतर ते मला म्हणाले की, तुम्हाला पैसे कमवायचे नाहीत का? काही अडचण आहे का तो हिरो जिंकला असता तर काय झाले असते. बाकी तर सगळं छान चाललं होतं.”

अनुराग कश्यपने असाही खुलाही केला की, त्याला सलीम खान व जावेद अख्तर या जोडीने पटकथा लिहिलेले चित्रपट खूप आवडतात. तो त्यांच्या चित्रपटांचा मोठा चाहता आहे. त्याने असाही खुलासा केला की, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तो आता त्याचा आगामी चित्रपट निशांची यामध्ये तसाच काहीतरी प्रयोग करणार आहे. अनुराग म्हणाला की, सलीम-जावेद अख्तर यांचे चित्रपट पाहत मी मोठा झालो. ज्या प्रकारची भव्य, भावनिक कथानक पाहत मोठा झालो, तसेच काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे लहानपणी मला आवडणाऱ्या चित्रपटांची आठवण करून देणारा चित्रपट आहे, ज्या चित्रपटांमध्ये सलीम-जावेद यांनी एकत्र लिहिले होते.”

अनुराग कश्यपने असेही म्हटले की, सलीम खान व जावेद अख्तर यांचे चित्रपट अयशस्वी झाले, असे क्वचित वेळा घडले. जंजीर, दीवार,त्रिशूल असे अनेक उत्तम चित्रपट आहेत. त्यांचे त्रिशूल आणि दीवार हे माझे आवडते सिनेमे आहेत. दोन्ही उत्तम चित्रपट आहेत.

अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख याच सलीम-जावेद जोडीमुळे मिळाली. बिग बींची एक वेगळी ओळख निर्माण झाली. दरम्यान, अनुराग कश्यपचा निशांची हा चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.