Anurag Kashyap Talk About Aishwary Thackeray Nishanchi Casting : दिग्दर्शक अनुराग कश्यप लवकरच त्याचा ‘निशांची’ हा सिनेमा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. या चित्रपटात त्याने एका नवोदित कलाकाराची निवड केली आहे आणि तो एखाद्या सामान्य घरातला मुलगा नाही, तर तो आहे बाळासाहेब ठाकरे यांचा नातू, ऐश्वर्य ठाकरे. मात्र, अनुराग कश्यपने त्याच्याविषयी कौतुक करीत म्हटलं की, ऐश्वर्यला ही भूमिका त्याच्या आडनावामुळे मिळालेली नाही; तर त्याच्या अभिनयकौशल्यामुळे मिळाली आहे.
NDTV ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने की ऐश्वर्यची निवड कशी झाली? त्याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, “मी त्याची शो-रील पाहिली. त्यात त्यानं मनोज बाजपेयींच्या ‘शूल’मधील एक मोनोलॉग केलाय आणि तो बघून मी थक्क झालो. मला त्या वेळी माहीतही नव्हतं की, तो मराठी आहे किंवा ठाकरे कुटुंबातला मुलगा आहे. मी त्याला लगेच भेटायला बोलावलं. त्यानंतरच मला कळलं की, तो बाळासाहेबांचा नातू आहे. मग मी त्याला स्क्रिप्ट दिली आणि सांगितलं की, वाचून काय वाटतं ते सांग.”
पुढे अनुरागनं सांगितलं, “मी नेहमीच माझ्या अभिनेत्यांच्या कुटुंबीयांना भेटतो. कारण- मला त्यांच्या वेळेची गरज असते. त्यामुळे मी स्मिता ठाकरे (ऐश्वर्यची आई) यांना भेटलो आणि स्पष्ट सांगितलं, जर मी त्याच्याबरोबर सिनेमा करीत आहे, तर मला त्याचा पूर्ण वेळ हवा आहे. अभिनयाच्या दृष्टीनं तो दुसरा कोणताही सिनेमा करू शकत नाही. संगीताच्या बाबतीत काही हरकत नाही; पण अभिनयाच्या बाबतीत मला त्याचा पूर्ण वेळ हवा आहे. जर तुम्हाला काही वेगळं प्लॅन करायचं असेल, तर तेही आताच सांगा.”
‘निशांची’ या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरेची दुहेरी भूमिका आहे आणि ती सादर करणं हे मोठं आव्हान होतं. त्याबाबत अनुरागनं सांगितलं, “प्रथम आम्ही चित्रपटाचा दुसरा भाग शूट केला, ज्यात त्याच्या पात्राच्या शरीरयष्टीत फरक दिसतो. लांब केस, जास्त वजन वगैरे. त्यानंतर दोन महिन्यांचा ब्रेक घेतला. या काळात त्याचे केस आणि दाढी कट करण्यात आली, त्यानं वजनही कमी केलं आणि मग पहिला भाग शूट केला. या दोन्ही पात्रांना एकत्र संवाद करताना दाखवण्यात आलं आहे आणि हे शक्य केलं Red Chillies VFX टीममधील Sylvester यांच्या मेहनतीमुळे. मी अभिमानानं सांगू शकतो की, आपण असं काही साध्य केलंय, जे इतरांना जमलं नाही.”
दरम्यान, अनुरागच्या ‘निशांची’ या चित्रपटात मोनिका पवार, मोहम्मद झीशान अयूब व कुमुद मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अजय राय, विपीन अग्निहोत्री व रंजन सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १९ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.