Anurag Kashyap Talk About Sushant Singh Rajput : बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप लवकरच ‘निशांची’ या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्त तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच एका मुलाखतीत त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दलची एक आठवण शेअर केली आहे.
‘निशांची’ सिनेमासाठी अनुरागने सुशांतबरोबर करण्याचं ठरवलं होतं. पण सुशांतला करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची दोन चित्रपटं मिळाल्यानंतर त्याने अनुरागशी संपर्क तोडला असं म्हटलं. अनुरागने याआधीही सांगितलं होतं की, ‘हसी तो फसी’ या चित्रपटातूनही सुशांतनं माघार घेतली होती. हा चित्रपट अनुराग करणार होता. पण सुशांतने ‘यशराज फिल्म्स’च्या ‘शुद्ध देसी रोमांस’ला प्राधान्य दिलं.
Galatta Plus बरोबरच्या गप्पांमध्ये अनुराग म्हणाला, “मी खूप आधीपासून ‘निशांची’ बनवण्याचा प्रयत्न करत होतो. इंडस्ट्रीमधील बरेच कलाकार या स्क्रिप्टबद्दल जाणून होते. अनेकांना याबद्दल रस होता. पण कुणाशीच तसं जुळलं नाही आणि मी ठरवलं होतं की, हा चित्रपट योग्य प्रकारेच करायचा.”
“२०१६ मध्ये निशांची चित्रपट सुशांतबरोबर करणार असल्याचं जाहीर केलं होतं” : अनुराग कश्यप
यानंतर अनुराग म्हणतो, “कधीकाळी हा चित्रपट मी सुशांतबरोबर करणार होतो. त्यानंतर त्याला दोन मोठे चित्रपट ‘दिल बेचारा आणि ‘ड्राईव्ह’ मिळाले, हे दोन्ही चित्रपट धर्मा प्रोडक्शनचे होते. मग माझा चित्रपट बाजूला पडला आणि त्याने माझ्याशी संपर्कच तोडला. २०१६ मध्ये ‘निशांची’ हा चित्रपट सुशांतबरोबर करणार असल्याचं जाहीर केलं होतं. २०१६ मध्ये ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामुळे सुशांतच्या करिअरला मोठं यश मिळालं आणि तो बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झाला.”
२०२० मध्ये, सुशांतच्या निधनानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अनुरागने सांगितलं होतं की, सुशांतने ‘हसी तो फसी’मधून माघार घेतली होती. कारण त्याला YRF (यश राज फिल्म्स) आणि धर्मा प्रोडक्शनकडून त्याला ऑफर्स आल्या होत्या.
याबद्दल अनुरागने NDTV ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “YRF ने त्याला सांगितलेलं की, ‘तुला एक डील देतो, तू ‘शुद्ध देसी रोमांस’ कर.’ सुशांतने YRF बरोबर करार केला आणि ‘हसी तो फसी’मध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक अभिनेत्याचं असंच असतं. पण मला त्याचा काही राग आला नाही.”
“‘एम.एस. धोनी’ सिनेमा यशस्वी ठरला आणि सुशांतने मला परत फोनच केला नाही” : अनुराग कश्यप
त्यानंतर अनुरागने ‘निशांची’ या चित्रपटाचा संदर्भ देत असंही म्हटलं की, “२०१६ मध्ये, ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमा रिलीज होण्यापूर्वी, मुकेश सुशांतकडे गेला आणि म्हणाला, ‘अनुरागने एक स्क्रिप्ट लिहिली आहे. एक उत्तर प्रदेशमधील पात्र असलेला अभिनेता हवा आहे’ असं त्याला सांगितल. पण ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ रिलीज झाला, यशस्वी ठरला आणि सुशांतने मला परत फोनच केला नाही. पण यामुळे मी त्याच्यावर नाराज नव्हतो.”