Anusha Dandekar Talks About Drinking Alchohol : अनुषा दांडेकर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं हिंदीसह मराठीतही काम केलं आहे. ती गेली २० वर्षं मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. त्याप्रमाणेच अनुशा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तिचा तिथे मोठा चाहतावर्ग आहे. अनुषा व्यवसायिक आयुष्यासह तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.
अनुषानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यातील काही प्रसंगांबद्दल सांगितलं आहे. तिनं डॉ. मधू चोप्रा यांच्याशी संवाद साधताना तिच्या मानसिक व शारीरीक आरोग्याबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये ती म्हणाली, “डाएट कोकचं एकेकाळी मी अति प्रमाणात सेवन केलं होतं आणि ती माझी खूप वाईट सवय होती.”
अनुशाने सांगितला ‘तो’ प्रसंग
अनुषा पुढे आई-वडिलांबद्दल म्हणाली, “मी माझ्या आई-वडिलांची आभारी आहे की, तरी त्यांनी मला कायम स्वातंत्र्य दिलं; पण, मला कधीच चुकीच्या गोष्टी करायच्या नव्हत्या.” यावेळी तिनं दारूचं सेवन करण्याबद्दलही सांगितलं आहे. अनुषा यावेळी तिच्या आयुष्यातील याबद्दलचा एक प्रसंग सांगत म्हणाली, “मी एकदा १४ वर्षांची असताना खूप दारू प्यायले होते. मला वाटलेलं की, ते फळांपासून बनलं आहे आणि मला त्याची चव खूप आवडली होती. त्यामुळे मी पूर्ण दारूची बाटली संपवली.”
अनुषा हा प्रसंग सांगत पुढे म्हणाली, “त्यानंतर मला रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. तेव्हा तिथल्या नर्सनं माझ्या वडिलांना तिला ओरडू नका. ती पुन्हा कधीच दारू पिणार नाही, असं सांगितलेलं.” अनुषा पुढे तिला कधीच ड्रग्ज किंवा अशा कुठल्याही गोष्टींचं सेवन करायचं नव्हतं, असं सांगत याबद्दल म्हणाली, “मला माझ्या आयुष्यात कधीच ड्रग्ज घ्यायचं नव्हतं. कधीच नाही. पण, माझं स्वत:वर नियंत्रण नाहीय. माझं स्वत:वरचं नियंत्रण सुटलं की, मी काहीही करू शकते म्हणून मला त्या गोष्टी नको होत्या.”
अनुषानं पुढे ती सिगारेट्सही ओढायची याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल ती म्हणाली, “मी लहान असताना माझ्या वडिलांना सतत सिगारेट ओढताना पाहिलं आहे. तेव्हा मला अस्थमा होता. त्यामुळेही मला या गोष्टींचं सेवन करायचं नव्हतं; पण मी सिगारेट्स ओढल्या आहेत. मला त्याचा वास अजिबात आवडत नाही.”
अनुषानं पुढे ती वयाच्या २० व्या वर्षी ऑस्ट्रेलियाहून मुंबईत स्थायिक झाल्याबद्दल सांगितलं आहे. अनुषा म्हणाली, “मी २० वर्षांची असताना भारतात आले होते. त्यावेळी मी खूप जबाबदार झाले होते. मी घर खरेदी केलेलं. मला एमटीव्हीमध्ये नोकरी मिळाली होती. त्या गोष्टीला मी कधीच गृहीत धरणार नाही.”