Arbaaz Khan Sshura Khan Age Gap : सलमान खानचा भाऊ अरबाज खान ५८ व्या वर्षी बाबा झाला आहे. अरबाज खानची दुसरी पत्नी शुरा खानला रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी मुलगी झाली. अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याने मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यावर २०२३ मध्ये शुरा खानशी दुसरं लग्न केलं होतं.
अरबाज खानने २४ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केलं होतं. त्याच्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय तसेच इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अरबाज खानने लग्न केलं तेव्हा तो ५६ वर्षांचा होता. शुरा खान अरबाजपेक्षा बरीच लहान असल्याने त्याच्यावर खूप टीका झाली होती. अरबाज खान व शुरा खान यांच्या वयात किती अंतर आहे? ते जाणून घेऊयात.
अरबाज खान-शुरा खान वयातील अंतर
अरबाज खान ५८ वर्षांचा आहे. त्याचा जन्म ४ ऑगस्ट १९६७ रोजी झाला होता. तर शुराचा वाढदिवस १८ जानेवारीला असतो. लग्नानंतर काही दिवसांनी म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये शुराचा वाढदिवस होता. त्यावेळी अर्पिता खानने तिला ३१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. लग्न केलं तेव्हा अरबाज ५६ वर्षांचा तर शुरा ३१ वर्षांची होती. आता अरबाज ५८ वर्षांची असून शुरा जानेवारीमध्ये ३३ वर्षांची होईल. दोघांच्या वयात २५ वर्षांहून जास्त अंतर आहे.
मलायका अरोराशी घटस्फोट अन् शुरा खानशी लग्न
अरबाज खानचे पहिले लग्न १९९८ मध्ये मलायका अरोराशी झाले होते. १९ वर्षांच्या संसारानंतर ते २०१७ साली विभक्त झाले. त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तर अरबाजचं नाव जॉर्जिया अँड्रियानीशी जोडलं जात होतं. पण त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अरबाजच्या आयुष्यात शुरा आली. काही काळ एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लग्न केलं.
अरबाज खान व शुरा यांची भेट ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शुरा खान ही बॉलीवूडमधील लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. तिने रवीना टंडनबरोबर बरीच वर्षे काम केलं आहे. “माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप लहान असली तरी ती १६ वर्षांची नाही. तिला तिच्या आयुष्यात काय हवंय ते माहीत होतं आणि मला माझ्या आयुष्यात काय हवंय ते मला माहित होतं. आम्ही एकमेकांकडून काय अपेक्षा करतो, आम्हाला काय हवं आहे आणि आम्ही आमच्या भविष्याकडे कसं पाहतोय हे समजून घेण्यासाठी एका वर्षात आम्ही खूप वेळ एकत्र घालवला. लग्नाचा निर्णय घाईत घेता येत नाहीत,” असं अरबाज खान लग्नानंतर एका मुलाखतीत म्हणाला होता.
दरम्यान, शुरा खान अजूनही रुग्णालयात आहे. अरबाज खानही तिच्याबरोबर आहे. अरहान खान त्याच्या चिमुकल्या बहिणीला भेटायला रुग्णालयात गेला होता. तसेच सोहेल खानचेही रुग्णालयात जातानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शुरा खानची आईही तिला भेटायला रुग्णालयात गेली होती.