Raghav Juyal Talks About Shahrukh Khan’s Mannat : राघव जुयाल सध्या आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आला आहे. त्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार झळकले आहेत. अशातच आता यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता राघव जुयालने शाहरुख खानच्या ‘मन्नत’बद्दल, तसेच आर्यन खानबद्दल सांगितलं आहे.
शाहरुख खानचा आलिशान बंगला मन्नत हा बॉलीवूडमधील श्रीमंत कलाकारांच्या घरांपैकी एक आहे. अशातच आता राघवने तो ‘मन्नत’मध्ये गेल्यानंतरचा अनुभव सांगितला आहे. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत मन्नतबद्दल राघव म्हणाला, “मी जेव्हा पहिल्यांदा मन्नतमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे विमानतळावर असतात तसे स्कॅनर होते. मलाही त्यातून जावं लागलं. कारण- तिथल्या लोकांना वाटायचं की, हा कोण आहे.”
शाहरुख खानच्या मन्नतमध्ये गेल्यानंतर भारावलेला राघव जुयाल
राघव पुढे म्हणाला, “मी चुकून आर्यनला विचारलं की, तुझी खोली कुठे आहे आणि नंतर लक्षात आलं की हे शाहरुख खानचं घर आहे. इथे खोल्या नाहीत, तर मोठे मजले आहेत. त्यावेळी आर्यन हसला आणि म्हणाला चल जाऊयात. त्यानंतर आम्ही त्याच्या मित्रांबरोबर डिनरसाठी गेलो”. शाहरुख खानच्या मन्नतमध्ये गेल्यानंतर राघव इतका भारावला होता की, तिथून बाहेर आल्यानंतर त्याने त्याच्या आईला मेसेज केला होता.
आईबद्दल राघव म्हणाला, “मी आईला फोन केला आणि म्हणालो की, मी नुकताच ‘मन्नत’मध्ये जाऊन आलो. तिला खूप आनंद झाला आणि ती विचारायला लागली की, मन्नत आतमधून कसं आहे, त्यांच्या बंगल्यामधील बाथरूम कसे आहेत, लायब्ररी आहे का? वगैरे”. ‘स्क्रीन’शी संवाद साधताना राघवनं सांगितलेलं की त्याच्या घरात सगळे शाहरुख खानचे चाहते आहेत. त्याबद्दल तो म्हणाला, “माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे. मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. आपण सगळेच त्याचे चाहते आहोत; पण मी खूपच मोठा चाहता आहे. मी त्याच्याबरोबर जेव्हा जेव्हा काम केलं आहे तेव्हा तेव्हा मला खूप आनंद झाला आहे आणि मला माहीत आहे की, यापुढेही अनेकदा आम्ही एकत्र काम करणार आहोत.”
राघवने पुढे शाहरुख खानबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवणही सांगितली. तो म्हणाला, “मी पहिल्यांदा शाहरुख खानसरांना भेटलो तेव्हा ‘हॅपी न्यू इयर’मध्ये मी डान्स केला होता २०१४ साली. त्यानंतर मी कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करत असताना अनेकदा त्यांना भेटलो; पण यावेळी मी आर्यन खानशी थेट संपर्कात आलो. मी ऑडिशन दिलेली आणि त्यानंतर माझी निवड झाली आणि पुढे जे झालं, ते सगळ्यांनाच माहीत आहे.” राघव जुयाल सिद्धार्थ आनंद यांच्या ‘किंग’ या आगामी चित्रपटातूनही झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये शाहरुख खानसह त्याची लेक सुहाना खानही झळकणार आहेत.