चंकी पांडेची पत्नी भावना पांडे नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ (Fabulous Lives of Bollywood Wives) या शोमधून प्रसिद्धीझोतात आली. भावना पांडेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही चित्रपटसृष्टीशी निगडीत नाही. १९९८ साली चंकी पांडेबरोबर लग्न झाल्यानंतर फिल्मी दुनियेला त्यांनी जवळून पाहिले. सुंदर दिसणाऱ्या लोकांच्या या दुनियेत त्यांना सुरुवातीच्या काळात थोडे असुरक्षित वाटायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे. याबरोबरच, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडिलांनी चंकी पांडेबरोबरच्या लग्नाला नकार दिल्याचे तिने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली भावना पांडे?

भावना पांडेने नुकतीच सिद्धार्थ कननच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने म्हटले, “आमच्याबरोबर गोष्टी फार वेगाने घडल्या. जेव्हा मी चंकीबरोबर लग्न केले, त्यावेळी मला थोडे असुरक्षित वाटत होते, कारण मी त्याला फक्त त्याच्या जगाबाहेरच ओळखत होते. मर्यादित फोन आणि प्रवास यामुळे फार एकत्र कधी राहिलो नव्हतो, त्यामुळे जेव्हा मी इथे आले तेव्हा मला असुरक्षित वाटू लागले, कारण मी अचानक त्या दुनियेत आले होते जिथे सुंदर आणि यशस्वी लोक आजूबाजूला असत. त्यांना तुम्ही आवडला पाहिजे म्हणून तुम्हाला जास्त कष्ट करावे लागत. मलासुद्धा असे वाटत होते की, चंकीला त्याच्या बायकोवर अभिमान वाटावा.”

तुमचा जोडीदार तुम्हाला कशी वागणूक देतो यावर एखाद्या व्यक्तीची असुरक्षततेची पातळी अवलंबून असते, असे म्हणत भावना पांडेने म्हटले, “माझ्या बाबतीत बोलायचे तर चंकीने मला खूप आधार दिला. खूप सहजतेने त्याने गोष्टी केल्या. एक काळ असा होता की, तो त्याच्या करिअरमध्ये खूप संघर्ष करत होता, त्यामुळे आम्ही एका युनिटसारखे होतो. घरातून मी माझ्या पद्धतीने त्याला खूप पाठिंबा दिला.”

अनन्याच्या जन्माबद्दल बोलताना भावनाने म्हटले, “आमच्या लग्नानंतर बरोबर नऊ महिने आणि सोळा दिवसांनंतर अनन्याचा जन्म झाला. आम्ही असे काही ठरवले नव्हते. गोष्टी फार वेगाने घडल्या, त्यामुळे एक असुरक्षित पत्नी आणि यशस्वी पती होण्याऐवजी आम्ही एका मुलीचे पालक बनलो. असुरक्षितता होती, मात्र गोष्टी ज्या पद्धतीने घडल्या आणि त्याने मला शिकवले की मला कोणत्याही गोष्टींची भीती बाळगायची गरज नाहीये. चंकीला त्यावेळी फार काम नसल्याने आम्ही खूप वेळ एकत्र घालवला, त्यामुळे आमच्यातील नाते मजबूत झाले.

पालकांचे मुलांबरोबर मित्रत्वाचे नाते असण्याचे महत्व सांगत भावनाने म्हटले, “मी मोठी होताना माझ्या पालकांना खूप घाबरत असे. मला अजूनही आठवतंय, चंकीबरोबरच्या नात्याविषयी माझ्या वडिलांना सांगण्याची माझी हिंमत नव्हती. मी आधी माझ्या आईला सांगितले, “मला चंकीबरोबर लग्न करायचे आहे.” यावर त्यांची प्रतिक्रिया, “काय?” अशी होती. मी त्यांचा सल्लाही घेतला नाही. माझ्या वडिलांनी मला कडक शब्दात सांगितले, “तू चंकी पांडेबरोबर लग्न करू शकत नाहीस. तो एक अभिनेता आहे. आपली कौटुंबिक पार्शभूमी अभिनय क्षेत्रातील नाही. आपल्याला ते जग माहीत नाही. जेव्हा तू मुंबईला जाशील तेव्हा तुझ्या करिअरचे काय?” मी त्यांना सांगितले की, मी चंकीबरोबरच लग्न करेन. मी चंकीबरोबर लग्न करण्याचे ठरवले होते. त्यामुळे मी माझ्या वडिलांचे ऐकले नाही. आज चंकी आणि माझे वडील यांचा खूप चांगला बाँड आहे. पण मी खूप भाग्यवान आहे, माझ्याबरोबर गोष्टी चांगल्या घडल्या”, असे म्हणत भावना पांडेने खासगी आयुष्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: तिलोत्तमाने सावलीचा गृहप्रवेश नाकारला आणि प्रेक्षक भडकले; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “एवढी तरी लाज वाटू द्या…”

दरम्यान, भावना आणि चंकी पांडेची लेक अनन्या पांडेदेखील चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करताना दिसत आहे. चित्रपटांमुळे तसेच तिच्या खासगी आयुष्यामुळे अनन्या सातत्याने चर्चेत असलेली पाहायला मिळते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhavana pandey recalled her father strictly asked not marry to chunky panday feel insecure in the beginning nsp