‘राज’, ‘जिस्म’, ‘नो एंट्री’, ‘ओमकारा’, ‘बचना ऐ हसीनों’, ‘रेस’ व ‘आक्रोश’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे बिपाशा बासू. २७ वर्षांपूर्वी मॉडेलिंगच्या क्षेत्रात नाव कमवल्यानंतर तिने मनोरंजन क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. मग अभिनेता अक्षय कुमारबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ‘अजनबी’ हा तिचा पहिला चित्रपट होता.

बिपाशा बासूची यशस्वी कारकीर्द सुरू असतानाच तिला एक असा चित्रपट ऑफर झाला, जो न करण्यासाठी तिला अनेकांनी सल्ला दिला होता. हा चित्रपट म्हणजे ‘जिस्म’. तिच्या कारकीर्दीतला हा एक महत्त्वाचा चित्रपट होता. पण तिला अनेकांनी या चित्रपटात काम न करण्यासाठी सल्ला दिला होता. याबद्दल तिने ‘टाइम्स नाऊ’शी तिची प्रतिक्रिया व्यक्त केली.

२००३ मध्ये ‘जिस्म’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जॉन अब्राहमने या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी, बिपाशा हे इंडस्ट्रीमध्ये आधीच प्रसिद्ध व लोकप्रिय असलेलं नाव होतं. त्यामुळे या चित्रपटामुळे तिच्या यशस्वी कारकिर्दीला धक्का लागू शकते, यामुळे अनेकांनी तिला या चित्रपटात काम न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीदेखील बिपाशाने यात काम केलं.

याबद्दल बिपाशा म्हणाली, “‘जिस्म’ हा चित्रपट अशा वेळी आला, जेव्हा मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर होते आणि सर्वजण मला म्हणायचे की, तू एका हिंदी नायिकेसारखी आहे. जिचं लोकांच्या हृदयात खूप स्थान आहे. त्यामुळे सर्व मला हा चित्रपट करण्यापासून रोखत होते. तेव्हा माझ्या मॅनेजरला वाटले की, मी वेडी झाले आहे.”

यापुढे ती म्हणाली, “या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत महिलांच्या भूमिकांबद्दलच्या धारणा बदलल्या. स्त्री नकारात्मक भूमिका करू शकत नाही, असा एक समज होता. तो यामुळे बदलला. तसंच यामुळे सौंदर्य आणि फॅशन ट्रेंडवरही परिणाम झाला. त्यामुळे जिस्म हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा चित्रपट होता.”

अमित सक्सेना दिग्दर्शित आणि पूजा भट्ट निर्मित आणि बिपाशा व जॉन अब्राहम यांची मुख्य भूमिका असलेला ‘जिस्म’ फक्त पाच कोटी रुपयांमध्ये बनला होता. पाच कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात १३ कोटींहून अधिक कमाई केली. त्यामुळेच हा चित्रपट बिपाशाच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट ठरला.

दरम्यान, बिपाशाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री गेल्या सात वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रापासून दूर आहे. २०२० मध्ये आलेल्या ‘डेंजरस’ या वेब सीरिजमध्ये पती करण सिंग ग्रोव्हरबरोबर तिने शेवटचं काम केलं होतं. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात एका आईची भूमिका साकारत आहे.