Anupam Kher Dance On Vicky Kuashal Tauba Tauba Song : बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी आजवर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या अभिनयाचे आज अनेक चाहते आहेत. मात्र, आता त्यांच्या अभिनयाबरोबरच डान्सचेसुद्धा चाहते होणार आहेत. याचं कारण- म्हणजे त्यांनी नुकताच केलेला ‘तौबा तौबा’वरील डान्स. हा डान्स पाहून अनेकजण आता त्यांच्या नृत्यकौशल्याचंही कौतुक करणार आहेत.

७० वर्षीय अभिनेते अनुपम खेर यांनी अलीकडेच डान्स शिकण्याचा निर्णय घेतला आहे. इतकी वर्ष ते मुद्दाम डान्सपासून दूर राहिले. कारण त्यांना वाटायचं की, ‘आपण डान्स करूच शकत नाही’, पण आता त्यांनी डान्स करण्याचाही निर्णय घेतला आहे. निर्णय घेताच त्यांनी ‘तौबा तौबा’ गाण्यावर भन्नाट डान्सही केला आहे.

अनुपम खेर यांनी आपल्या सोशल मीडियावर या डान्सच्या प्रॅक्टिसचा व्हिडीओ शेअर केला आहे. बॉस्को-सीझर या प्रसिद्ध कोरिओग्राफर जोडीमधील सीझरशी त्यांची नुकतीच भेट झाली. या भेटीत अनुपम यांनी डान्स शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर सीझरने सुरुवातीला त्यांना हसत प्रतिसाद दिला. पण, नंतर त्याने अनुपम यांना विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्याच्या हुक स्टेप्स शिकवल्या.

‘तौबा तौबा’ डान्सच्या प्रॅक्टिसच्या व्हिडीओसह अनुपम खेर यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. अनुपम खेर म्हणतात, “गेल्या महिन्यात मी ठरवलं की, आता खरंच डान्स शिकायचाच आणि गेल्या आठवड्यात माझा पहिलाच डान्स क्लास झाला. दोन दिवसांपूर्वी जिममध्ये माझी भेट प्रसिद्ध कोरिओग्राफर सीझरशी झाली आणि त्याला मी माझ्या डान्स शिकण्याबद्दल सांगितलं. त्यावर तो आधी हसला, पण त्याने नंतर अवघ्या काही मिनिटांत मला डान्स शिकवला. आता तुमच्यासमोर माझा पहिलाच डान्स व्हिडीओ सादर करत आहे, कृपया हसू नका… त्याऐवजी प्रोत्साहन द्या.”

विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’वर अनुपम खेर यांचा डान्स

दरम्यान, ‘तौबा तौबा’ या मूळ गाण्यात अभिनेता विकी कौशलनं डान्स केला आहे. त्यामुळे या व्हिडीओखाली अनुपम खेर यांनी विकीचा उल्लेख करीत, “विकी कौशल काय म्हणतोस?” असंही म्हटलंय. विकी कौशलनंही अनुपम यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

अनुपम यांच्या डान्स व्हिडीओवर कमेंट करीत विकी म्हणतो, “जबरदस्त परफॉर्मन्स सर”. इतकंच नव्हे; तर विकीनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही शेअर केला आहे आणि “जो डान्स शिकायला मला पूर्ण एक दिवस लागला, तोच डान्स तुम्ही अवघ्या १० सेकंदांत शिकून सहज करून दाखवला” असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे.