Saif Ali Khan Recall Knife Attack : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गेल्या वर्षी १६ जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याबद्दल सैफ आणि पत्नी करीना यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे.
अशातच सैफने नुकत्याच एका मुलाखतीत या हल्ल्याबद्दलची पुन्हा आठवण सांगितली आहे. या घटनेतून जिवंत वाचलो हा चमत्कार असल्याचं सैफने म्हटलं. एक अज्ञात व्यक्ती घरी घुसली आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या पाठीच्या मणक्याजवळ खोल जखम झाली. या हल्ल्यात जरी सैफला गंभीर दुखापत झाली असली तरी सैफने निःशस्त्र असतानाही त्या हल्लेखोराचा सामना केला.
Esquire India ला दिलेल्या मुलाखतीत सैफने सांगितलं, “खूप नशिबवान होतो मी. या हल्ल्यातून मी फारच थोडक्यात वाचलो. मला काहीच झालं नाही असं म्हणता येणार नाही; पण अशा हल्ल्यातून सुरक्षित वाचणं म्हणजे हा खरंच एक चमत्कारच आहे.”
पुढे त्याने सांगितलं की, “त्याक्षणी ते सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटलं होतं. मी खूप नशिबवान आहे. केवळ पैशाच्या बाबतीत नाही, पण एकूणच मला आयुष्यात खूप काही अनुभवायला मिळालं. त्या सगळ्यासाठी मी स्वत:ला नशिबवान समजतो. मला आयुष्यात सगळं काही उत्तम मिळालं आहे.”
दरम्यान, चाकू हल्ल्यात सैफच्या पाठीत शस्त्र रुतलं होतं. रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी लीलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रियाही झाली होती. सैफच्या शरीरातून चाकूचा २.५ इंचाचा तुकडा काढला गेला.
मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या व्यक्तीने सैफवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर त्याला लगेचच अटक करण्यात आली. हल्ल्यानंतरच्या समोर आलेल्या काही वृत्तांनुसार, त्याचा उद्देश चोरी करण्याचा होता आणि त्याने सैफ आणि एका कर्मचाऱ्यावर लाकडी वस्तू आणि चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यातून सावरत सैफने काही दिवसांनी त्याच्या कामाला सुरुवात केली.
करीना कपूर इन्स्टाग्राम पोस्ट
सैफ अली खान नुकताच नेटफ्लिक्सवरील Jewel Thief: The Heist Begins मध्ये झळकला होता. यानंतर तो पुढच्या चित्रपटांची तयारीसुद्धा करत आहे. लवकरच त्याचा आगामी ‘हैवान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या सिनेमात सैफ आणि अक्षय कुमारची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.