Varun Dhawan Trolls : शारदीय नवरात्रीच्या दिवसांत कन्या पूजन केलं जातं. कन्यापूजन हे श्रद्धेचे प्रतीक आहे, कन्यपूजन केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे अनेक मराठी कलाकारांनी कन्यापूजन केले होते. बॉलीवूड अभिनेता वरुण धवननेदेखील आपल्या घरी कन्यापूजन केले होते. अभिनेत्याच्या या कृतीमुळे अनेकांची मनं जिंकली होती. मात्र याच कृतीमुळे तो टीकेचा धनीही झाला आहे.
वरुण धवनने मंगळवारी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कन्या पूजनचे काही खास फोटो चाहत्यांसह शेअर केले. अभिनेत्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो काही शाळकरी मुलींसह जेवण करताना दिसत आहे. पण यामुळे अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.
त्याचं झालं असं की, वरुणने कन्यापूजनसाठी घरी बोलवलेल्या लहान मुलींना जेवणासाठी टाकाऊ पत्रावळ्या दिल्या; तर स्वत: मात्र स्टीलच्या ताटात जेवताना दिसत आहे. स्वत:साठी स्टीलचं ताट आणि मुलींना टाकाऊ पत्रावळ्या दिल्यानं तो नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी बनला आहे. त्याच्या या वागणुकीबद्दल अनेकांनी त्याला सुनावलं आहे.
याबद्दल एका नेटकऱ्याने लिहिलं, “सर, तुम्ही स्वतः स्टीलच्या ताटात जेवण करत आहात आणि मुलांना प्लास्टिकच्या ताटात जेवण देत आहात, हे पूर्णपणे चुकीचे आहे.” तर आणखी एकाने म्हटलं, “लहान मुलींची ताटे वेगळी आहेत? त्यांना पेपर प्लेट दिलीय.. ही तर चुकीची गोष्ट आहे.” तसंच आणखी एक नेटकरी म्हणतो, “तू मुलींना जी प्लेट दिली आहेस, त्यात तू स्वत: का जेवण करत नाहीस?”
वरुण धवन इन्स्टाग्राम पोस्ट
वरुणने या फोटोसह त्याच्या ताटाचासुद्धा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोत त्याच्या ताटाची कडा तुटल्याचं पाहायला मिळत आहे. ही गोष्टसुद्धा नेटकऱ्यांनी अचूक पकडली असून, ‘तुमच्या घरातले ताटसुद्धा तुटलेले आहेत का?’ असा प्रश्न विचारला आहे. काही नेटकऱ्यांच्या टीका सोडल्यास अनेक जणांनी वरुणच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. ताटामधील फरक सोडता त्याच्या साधेपणा आणि संस्कारांची अनेकांनी प्रशंसा केली आहे.
दरम्यान, वरुणच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, त्याचा नुकताच Sunny Sanskari Ki Tulsi Kumari हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात त्याच्यासह अभिनेत्री जान्हवी कपूरही मुख्य भूमिकेत आहे. वरुण आणि जान्हवीबरोबरच या सिनेमात रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा हे कलाकारही आहेत.