अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री कतरिना कैफ बॉलीवूडमधील आदर्श जोडी मानली जाते. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. अनेकदा दोघे जाहीरपणे एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. सोशल मीडियावर दोघे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. विकी व कतरिना एकमेकांबरोरचे अनेक फोटो शेअर करताना दिसतात. दरम्यान, एका मुलाखतीत विकीने कतरिनाबरोबरच्या नात्यावर भाष्य केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीने लग्नानंतर त्याच्यात काय बदल झाला याबाबत खुलासा केला आहे. विकी म्हणाला, “कोणाची तरी काळजी घेणं आणि त्यांच्यावर मनापासून प्रेम करणं प्रेमाचा हा पैलू मला आवडतो. जेव्हा मी कतरिनाबरोबर असतो तेव्हा मला सगळं सुरळीत सुरू असल्याचं जाणवतं. लग्नानंतरच्या अडीच वर्षांत मी एवढा समजूतदार बनलो आहे; जेवढा मी गेल्या ३३ वर्षांत कधीच नव्हतो. पूर्वी मी छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप अडून राहायचो. जसं की जेवायला काय मागवायचं, सुटीत कुठे फिरायला जायचं; पण आता आम्ही गंभीर विषयांवरही चर्चा करून मार्ग काढतो.”

विकी पुढे म्हणला, “लग्नानंतर व्यक्ती कधीही एकसारखी राहत नाही. आपण आपलं आयुष्य कोणाबरोबर तरी जगणार आहोत ही एक वेगळी भावना असते. लग्नाआधी फक्त तुम्ही असता. तुमचा दिनक्रम, तुमचे विचार, तुमचे निर्णय हे फक्त तुमचे असतात. पण, तुम्ही जेव्हा लग्न करता तेव्हा तुम्ही ‘दोघं’ असता. लग्नानंतर तुमचं आयुष्य बदलतं. डेटिंगच्या काळात जेव्हा मी कतरिनाला भेटायचो तेव्हा माझ्यामध्ये एक उत्साह होता आणि तो आजही कायम आहे. मी स्वत: रोमँटिक नाही; पण कतरिना मला रोमँटिक बनवते. मी खूप हट्टी आहे; पण कतरिना खूप भावनिक आहे. तिचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ती माझ्यासाठी माझं संपूर्ण घर आहे.”

हेही वाचा- ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

विकी कौशल व कतरिना कैफने ९ डिसेंबर २०२१ ला लग्नगाठ बांधली. राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नातेवाईक व जवळच्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.