Vivek Oberoi Road Accident : कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. मराठीसह हिंदी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांचं रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झालं आहे. अशाच एका अपघातातून आपण मरता मरता वाचलो असल्याचं प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. हा अभिनेता म्हणजे विवेक ऑबेरॉय.

‘साथिया’, ‘कंपनी’, ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’, ‘ग्रँड मस्ती’सारख्या सिनेमांमधून त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता लवकरच तो ‘मस्ती ४’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विवेकसह रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सध्या हे तिघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत विवेक ऑबेरॉयने आयुष्यातील एक धोकादायक आणि जीवघेणा प्रसंग सांगितला. राजस्थानमध्ये ‘रोड’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका रस्ते अपघाताचा धक्कादायक अनुभव त्याने शेअर केला आहे.

या अनुभवाबद्दल विवेक म्हणाला, “मी ‘रोड’ या चित्रपटासाठी राजस्थानमध्ये शूट करत होतो. आम्ही बीकानेरहून जैसलमेरकडे जात होतो. सुंदर रस्त्यावर आम्ही छान ड्राइव्ह करत जात होतो. रात्रीची वेळ होती. मी ड्रायव्हरला किमान १५-२० वेळा सांगितलं होतं की ‘तू गाडी हळू चालव, रात्री लांबचं दिसत नाही, त्यामुळे गाडी सावकाश चालव.’ मी गाडीच्या पुढच्या सीटवर बसलो होतो.”

यापुढे विवेक म्हणाला, “मी सीट मागे घेतली. पुढे अचानक एक मोठा आवाज झाला. रस्त्यावर अचानक लोखंडी रॉड्स घेऊन जाणारी एक उंटगाडी आली. त्या लोखंडी रॉड्स थेट आमच्या गाडीच्या काचेत घुसल्या. माझी सीट जर सरळ असती तर त्या रॉड्स सरळ माझ्या शरीरातच गेल्या असत्या. तेव्हा मी कारमधून बाहेरही पडू शकत नव्हतो, कारण मी त्या रॉड्समध्येच अडकलो होतो. पण, मी त्यातून सुदैवाने वाचलो. मी अक्षरशः मृत्यूच्या दारातून परत आलो आहे. त्यानंतर मी ठरवलं की, कधीही रात्री प्रवास करणार नाही.”

विवेक ऑबेरॉय इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे विवेकने आणखी एक प्रसंग सांगितला. “एकदा मी दुसऱ्या ड्रायव्हरबरोबर प्रवास करत होतो. त्यानेही गाडीचा वेग वाढवायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं की, गाडी थांबव आणि वॉशरूमला जा. तो खाली उतरल्यावर मी त्याच्या बाजूला गेलो, चावी घेतली आणि त्याला तिथेच ठेवून गाडी स्वतः चालवत निघून गेलो.”

दरम्यान, ‘मस्ती ४’शिवाय विवेक आगामी काळात मोठ्या सिनेमांमधून पडद्यावर दिसणार आहे. रणबीर कपूरसोबतच्या ‘रामायण’ या चित्रपटात विवेक ऑबेरॉयची भूमिका आहे. तसंच विवेक ऑबेरॉय रितेश देशमुखच्या एका मराठी चित्रपटात दिसणार आहे. शिवाय प्रभाससोबतच्या ‘स्पिरीट’ या अ‍ॅक्शन-ड्रामामध्येही विवेक ऑबेरॉय दिसणार असल्याचं म्हटलं जातंय.