Kajol React On Ramoji Film City : बॉलीवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी ‘माँ’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटासाठी जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अलीकडेच ती प्रमोशनसाठी हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये गेली होती. यावेळी तिने तिथे दिलेल्या मुलाखतीत रामोजी फिल्मसिटीबद्दल एक धक्कादायक गोष्ट उघड केली आणि ती म्हणाली की, या ठिकाणी शूटिंग करताना तिला नेहमीच अस्वस्थ वाटतं.

काजोलने मुलाखतीत असाही दावा केला की, रामोजी फिल्मसिटीमध्ये ‘भुताटकीचं वातावरण’ आहे आणि ती म्हणाली की, तिला ही जागा सोडून परत जावंसं वाटतं. तसेच या ठिकाणी परत येऊच नये, अशी इच्छा असते. रामोजी फिल्मसिटीच्या ठिकाणी भुताटकीचं वातावरण असल्याच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. तिचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यामुळे तिला काही प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

अशातच तिने या प्रकरणी तिची बाजू मांडली आहे. अभिनेत्रीने या प्रकरणी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती असे म्हणतेय, “माझ्या ‘माँ’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मी रामोजी फिल्मसिटीबद्दल केलेल्या आधीच्या टिप्पणीला उत्तर देऊ इच्छिते. “मी रामोजी फिल्मसिटीमध्ये अनेक चित्रपटांसाठीचं चित्रीकरण केलं आहे.”

काजोलने शेअर केलेली एक्स पोस्ट

नंतर ती असं म्हणते, “गेल्या काही वर्षांत मी तिथे अनेक वेळा राहिले आहे. चित्रपट निर्मितीसाठी मला ते खूप चांगले ठिकाण वाटलं आहे. तिथे काम करताना मला चांगल्या वातावरणाचा अनुभव आला आहे. तसेच मी तिथे अनेक पर्यटकांना आनंद घेताना पाहिलं आहे. ते एक उत्तम ठिकाण आहे. कुटुंबं आणि मुलांसाठी हे पूर्णपणे सुरक्षित ठिकाण आहे.”

ओडिशा टीव्हीच्या वृत्तानुसार ‘माँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान काजोल म्हणाली होती, “आम्हाला शूटिंगच्या वेळी रात्री कुठे झोपायचं हेदेखील माहीत नसतं. आम्ही एखाद्या ठिकाणी शूट केलं तरी त्या ठिकाणी आम्हाला परत जावंसं वाटत नाही. अशी अनेक ठिकाणं आहेत. आपल्याकडे याची उत्तम उदाहरणं आहेत. त्यापैकी एक हैदराबादमधील रामोजी राव स्टुडिओ.”

पुढे काजोल म्हणाली होती “रामोजी राव स्टुडिओ हे जगातील सर्वांत भुताटकीच्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं. या ठिकाणी मला शूटिंग करताना नेहमीच अस्वस्थ वाटायचं. पण देवानं माझं रक्षण केलं आणि मी काहीही पाहिलं नाही.” रामोजी फिल्मसिटी ही भारतातील प्रमुख चित्रपट निर्मिती ठिकाणांपैकी एक आहे. बॉलीवूड, टॉलीवूडसह अनेक भाषांमधील ब्लॉकबस्टर चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे.