बॉलिवूडमध्ये आजही बाह्यरूपाला जास्त महत्त्व आहे. आजही बॉलिवूडमध्ये हीरो मटेरियलची व्याख्या तीच आहे. बॉलिवूडमध्ये हीरो म्हंटलं की घारा गोरा अशीच प्रतिमा आपल्यासमोर उभी राहते. गेल्या काही वर्षात हे चित्र बदललं जरी असलं तरी अजूनही इंडस्ट्रीमध्ये कोणताही कलाकार अगदी लगेच साचेबद्ध होतो. अभिनेता नवाजूद्दीन सिद्दीकी यानेही यावर भाष्य केलं आहे. आता नुकतंच अभिनेत्री कल्की कोचलीन हिनेसुद्धा याबाबत एक बोल्ड वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३८ वर्षीय कल्कीने नुकतंच तिच्या मुलीला जन्म दिला आहे आणि गेली २ वर्षं ती चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. चित्रपटसृष्टीत आजही तुमच्या रंगाला महत्त्व आहे असं विधान कल्कीने केलं आहे. विविध भूमिका करूनही कल्कीच्या वाटेला आजही उच्चभ्रू कुटुंबातील मानसीकरित्या कमकुवत असलेल्या मुलीच्याच भूमिका येतात याबद्दल तिने खंत व्यक्त केली आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये कल्की म्हणते, “आजही कित्येक दिग्दर्शक माझ्याकडे उच्चभ्रू कुटुंबातील थोडी बिघडलेल्या अशा महिलेची भूमिका मला ऑफर करतात, हे पाहून खरंच मला वैताग येतो. माझ्या त्वचेचा रंग तसाच असल्याने मला त्याच प्रकारच्या भूमिका मिळतात.”

आणखी वाचा : Photos : ‘तुंबाड’नंतर राही बर्वे गेली ४ वर्षं करतायत ‘या’ वेबसीरिजवर काम; पडद्यामागचे फोटो पाहून व्हाल अचंबित

‘ये जवानी है दिवानी’, ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ अशा चित्रपटातून हटके भूमिका साकारणारी कल्की पुढे म्हणते, “एखाद्याचा वर्ण सावळा किंवा गव्हाळ असेल तर त्या कलाकाराला नोकराची भूमिका मिळते आणि हे असं साचेबद्ध होणं खरंच खूप संतापजनक आहे. मी अजूनही एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहे.” कल्कीच्या या वक्तव्यावरुन चित्रपटसृष्टीत हा प्रकार किती रूढ झाला आहे याचा अंदाज आपल्याला येतो.

‘देव डी’, ‘गली बॉय’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘शैतान’ अशा चित्रपटात कल्कीच्या भूमिकेचं आणि तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. कल्की आता आगामी ‘गोल्डफिश’ या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटात कल्की अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे जी डीमेंशिआची रुग्ण आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kalki koechlin says your sking color dictates the role you play in movies avn