Neena Gupta Response On Troll : ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्या त्यांच्या चित्रपट आणि अभिनयाबरोबरच बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळेही तेवढ्याच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या कपड्यांमुळे किंवा त्यांच्या काही वक्तव्यांमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. मात्र या ट्रोलर्सना नीना गुप्ताही योग्य प्रकारे उत्तर देतात.
अशातच नुकतंच एका नेटकरी महिलेने त्यांना वयावरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नीना गुप्तांनीसुद्धा त्यांच्या अंदाजात या महिलेला उत्तर दिलं. नीना गुप्तांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्या विमानतळावर बसून जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात. त्या वेळी त्यांनी निळ्या रंगाचा छोटा ड्रेस परिधान केला होता.
अनेक चाहत्यांनी नीना गुप्तांच्या लूकचं आणि साधेपणाचं कौतुक केलं आहे. पण एका महिलेने या व्हिडीओवर “खूप छान, फक्त एक विनंती होती की, तुमचे पाय दाखवू नका. आम्ही आजीला अशाप्रकारे पाय दाखवताना कधी पाहिलेलं नाही.” अशी कमेंट केली आहे. या कमेंटवर अनेकांनी संताप व्यक्त केला.
नीना गुप्तांच्या व्हिडीओवर टीका करणाऱ्या महिलेला उत्तर देत दुसरी महिला म्हणते, “एका महिलेकडून दुसऱ्या महिलेला वयावरुन अशी कमेंट? तुम्ही शरीरावर टीका करून स्वतःचाच दर्जा दाखवत आहात.” मात्र नीना गुप्ता यांनी टीका करणाऱ्या महिलेला संयमी आणि योग्य उत्तर दिलं आहे.
वयावरून टीका करणाऱ्या महिलेला नीना गुप्ता उत्तर देत असं म्हणतात, “हे लोक असं बोलतात, कारण त्यांना स्वत: शरीर चांगलं नसल्याचा मत्सर वाटतो. त्यामुळे दुर्लक्ष करा.” नीना गुप्ता यांनी ट्रोल करणाऱ्या महिलेलाही शांतपणे आणि योग्य उत्तर दिल्याने अनेकांनी त्यांच्या या स्वभावाचं कौतुक केलं आहे.
नीना गुप्ता या नेहमीच आपल्या लूकबाबत वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. त्या अनेकदा स्टायलिश कपड्यांतील फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यांचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व हे सिद्ध करतं की, वय म्हणजे फक्त एक संख्या आहे.
दरम्यान, नीना गुप्तांच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर त्या अलीकडेच अनुराग बासू यांच्या ‘मेट्रो… इन दिनो’ या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख, अली फजल, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी आणि कोंकणा सेन शर्मा यांच्याही भूमिका होत्या.