Deepika Padukone Padmaavat Fee : दीपिका पादुकोणची अलीकडेच दोन चित्रपटांतून एक्झिट झाली. आधी संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’मध्ये तिला तृप्ती डिमरीनं रिप्लेस केलं आणि नंतर नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’च्या सीक्वेलमधून तिला काढण्यात आलं. दीपिकानं दिवसाला फक्त आठ तास काम करण्याची मागणी केलेली, ज्यामुळे तिच्यामध्ये व मेकर्समध्ये एकमत झालं नाही आणि तिची चित्रपटातून एक्झिट झाली.
दीपिकानं यापूर्वीसुद्धा तिच्या अपेक्षा, मतं ठामपणे मेकर्ससमोर मांडली आहेत. पूर्वी २०१७ दरम्यान संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीदेखील अभिनेत्रीनं यामधील तिचे सहकलाकार रणवीर सिंह व शाहीद कपूर यांच्यापेक्षाही जास्त मानधनची मागणी केलेली.
दीपिकाने ‘पद्मावत’साठी घेतलेले तब्बल ‘इतके’ कोटी
‘एएनआय’च्या वृत्तानुसार दीपिका पादुकोण या चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारी सेलिब्रिटी होती. तिला तिचा नवरा रणवीर व शाहीद कपूर यांच्यापेक्षा जास्त मानधन मिळालेलं. त्यामध्ये तिनं राणी पद्मिनीची भूमिका साकारलेली आणि आधी या चित्रपटाचं नाव पद्मावती, असं होतं. परंतु, नंतर चित्रपटाचं नाव पद्मावत, असं करण्यात आलं. या चित्रपटासाठी दीपिकानं तब्बल १३ कोटी रुपये इतकं मानधन घेतलं होतं; तर रणवीर सिंह व शाहीद कपूरला प्रत्येकी १० कोटी इतकं मानधन मिळालेलं. जे दीपिकाला मिळालेल्या मानधनाच्या तुलनेत कमी होतं.
‘टाइम्स’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाला जेव्हा ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिच्या मानधनाविषयी विचारण्यात आलेलं तेव्हा तिनं, “माझ्या कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या मानधनाबद्दल मला फार उत्सुकता नाही; पण माझं जे काही मानधन आहे, त्यासाठी मला स्वत:चा खूप अभिमान आहे. तुम्हाला जेवढे पैसे मिळतात, त्यात तुम्ही समाधानी असता; पण मला आनंद याचा होतो की, निर्मात्यांनी चित्रपटात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ज्याच्या एका पोस्टमध्ये मी झळकत आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे.” असं म्हटलेलं.
याबद्दल ती पुढे म्हणालेली, “हा खूप भव्य चित्रपट आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. आपण यापूर्वी काही चित्रपटांत स्त्रियांना महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना पाहिलं आहे. मला असं वाटतं की, महिला कलाकारांच्या दृष्टीनं ‘पद्मावत’ एक नवीन सुरुवात आहे.” अभिनेत्रीनं यासह पुरुष कलाकारांना मिळतं तितकं मानधन स्त्री कलाकारांनाही मिळायला हवं याबद्दलही मत व्यक्त केलेलं. ती म्हणालेली, “तुम्हाला स्वत:ला जाणवतं की, तुम्ही जे करीत आहात त्यासाठी तुम्हाला अधिक मानधन मिळायला हवं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं वाटतं तेव्हा तुमची त्यासाठी तेवढी पात्रताही असते.”
“अनेक वर्ष आपल्याला जे मिळतंय, त्यात समाधानी राहायला हवं आणि जास्तीची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे, असंच सांगण्यात आलेलं असतं. पण, मला असं वाटतं की, तुमची जी पात्रता आहे, त्यानुसार तुम्हाला पैसे मिळायलाच हवेत. त्यासाठी भांडावं लागलं तरी हरकत नाही सुरुवातीला आपल्याला थोडं विचित्र वाटू शकतं. कारण- कित्येक वर्षं आपल्याला तेच सांगण्यात आलेलं असतं.”