बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिका, कधी सोशल मीडियावरील पोस्ट, तर कधी त्यांचे वक्तव्य यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी, ॲंग्री यंग मेन या डॉक्युमेंट्रीमध्ये जावेद अख्तर यांच्याबरोबर त्यांनी केलेल्या वर्तनाचा त्यांना आजही पश्चात्ताप होतो, असे म्हटले आहे.

धर्मेंद्र यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या आयुष्यावर बेतलेली डॉक्युमेंट्री प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. त्यामध्ये धर्मेंद्र सांगतात की, ज्यावेळी मी ‘यकीन’ हा चित्रपट करीत होतो. त्यावेळी एक सडपातळ मुलगा माझ्याकडे संवादाची पाने देण्यासाठी आला. तो खूप सुंदर आणि निरागस दिसत होता. पण त्याने जी पाने दिली होती, ती क्रमाने लावली गेली नव्हती. मी ती पाने रागात फेकून दिली आणि त्याला सांगितले की, ही पाने व्यवस्थित लावून दे. मला आजही आश्चर्य वाटते की, मी ते कृत्य का केले? मी जे केले होते, त्या गोष्टीचा मला खूप पश्चात्ताप झाला. कारण- चित्रपटसृष्टीतील संघर्ष मी समजू शकतो.

हेही वाचा: Bigg Boss Marathi : निक्कीच्या निर्णयामुळे ‘ए’ टीममध्ये पडली फूट, वैभव-घनःश्यामने उठवला आवाज, म्हणाले, “हिच्या वागण्यामुळे टीमचा घात”

जावेद अख्तर आणि धर्मेंद्र या दोघांनी ‘शोले’ या लोकप्रिय चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

सलीम खान आणि जावेद अख्तर यांनीदेखील आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांना कोणत्या संघर्षाला सामोरे जावे लागले हे सांगितले आहे. जावेद अख्तर यांनी सांगितले की, मुंबईच्या रस्त्यावर भुकेने व्याकूळ झालेल्या अवस्थेत कित्येक रात्री काढल्या आहेत. किशोरवयात कुटुंबाला सोडून मुंबईमध्ये सहायक दिग्दर्शक बनण्यासाठी आलो होतो. आधी सहायक दिग्दर्शक बनेन आणि नंतर चित्रपट निर्मितीचे शिक्षण पूर्ण करीन, असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुंबईत आलो. १९६९ साली यकीन चित्रपटात असिस्टंट म्हणून काम केले होते. अशी आठवण जावेद अख्तर यांनी सांगितली आहे. तर सलीम खान यांनी सांगितले की, इंदोरमध्ये अनेक सुखांचा उपभोग घेतल्यानंतर मुंबईत कामासाठी आल्यावर अर्ध्या रूममध्ये राहायचो.

दरम्यान, सलीम खान आणि जावेद अख्तर या लेखकांची जोडी बॉलीवूडमध्ये मोठी प्रसिद्ध आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलण्यात या दोघांचे मोठे योगदान असल्याचे म्हटले जाते. आता अँग्री यंग मेन या डॉक्युमेंट्रीमधून त्यांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही डॉक्युमेंट्री तीन भागांत विभागली गेली आहे.