Deepika Padukone first Indian to be part of Hollywood Walk of Fame: बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणचे नाव घेतले जाते. अभिनेत्रीने २००७ साली ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दीपिकाने ‘पिकू’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘कल्की : २८९८ एडी’ अशा अनेक चित्रपटांत काम करीत इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले.

हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये स्टार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

आजवर अभिनेत्रीला तिच्या अभिनयासाठी विविध पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. दीपिकाला पादुकोण ‘हॉलीवूड वॉक ऑफ फेम’मध्ये स्टार मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

नुकतेच हॅालीवूड चेंबर ऑफ कॅामर्सने तिला २०२६ च्या मोशन पिक्चर्स श्रेणीतील हॉलीवूड वॅाक ऑफ फेममध्ये स्टार देऊन सन्मानित केले आहे. हॉलीवूड चेंबर ऑफ कॉमर्सने इन्स्टाग्राम अकाउंटवर ही माहिती शेअर केली आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का हॉलिवूड वॉक ऑफ फेममधील या स्टारची किंमत ७३ लाख रुपये आहे.

हॉलीवूड वॉक ऑफ फेमच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कोणतीही व्यक्ती एखाद्या कलाकाराला स्टार मिळावा, यासाठी त्या कलाकाराचे नाव सुचवू शकते. पण, हे नामांकन देताना त्या कलाकार अथवा त्याच्या व्यवस्थापन टीमची परवानगी असलेले करारपत्र सादर करावे लागते. जर कलाकार किंवा त्याच्या टीमचे करारपत्र नसेल, तर समिती तो अर्ज स्वीकारत नाही.

निवड झाल्यानंतर त्या कलाकाराला किंवा त्या कलाकाराच्या प्रायोजकाला हॉलीवूड वॉक ऑफ फेमच्या स्टारसाठी एक रक्कम भरावी लागते. ही रक्कम ८५ हजार डॉलर्स म्हणजेच ७३ लाख रुपये इतकी आहे. त्याशिवाय अॅप्लिकेशन फॉर्म मिळविण्यासाठी २७५ डॉलर्स म्हणजेच २३ हजार ५३० रुपये भरावे लागतात. प्रत्येक वेळी अर्ज करताना ही इतकी रक्कम भरावी लागते. आता हॉलीवूड वॉक ऑफ फेमसाठी दीपिकाने स्वत: अर्ज केला होता की इतर कोणी, याबद्दल अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.

दीपिका पादुकोण कायमच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केले आहे. काहीं दिवसांपासून कामाचे तास कमी करण्याच्या चर्चांमुळे ती चर्चेत आहे. कामाचे तास कमी करण्याच्या मागणीमुळे तिच्या हातातून काही महत्वाचे प्रोजेक्ट निसटल्याचे म्हटले जात आहे. दीपिका पादुकोणने मुलीच्या जन्मावेळी काही काळाकरता ब्रेक घेतला होता. आता ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.