दिशा पाटनी व खुशबू पाटनी यांच्या बरेली येथील घरावर शुक्रवारी (१२ सप्टेंबर) पहाटे गोळीबार झाला. दिशाच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. रोहित गोदारा गोल्डी ब्रार गँगने सोशल मीडिया पोस्ट करून या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या घटनेबद्दल आता दिशाचे वडील जगदीश सिंह पाटनी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
दिशाचे वडील जगदीश पाटनी हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. एएनआयशी बोलताना घरावरील गोळीबाराबद्दल ते म्हणाले, “माझ्या घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. पोलीस तपास करून हल्लेखोरांना पकडण्याचे सर्व शक्य प्रयत्न करत आहेत. बरेली पोलीस, एसएसपी, एडीजी सर्वजण या प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्या गोळ्या झाडण्यात आल्या त्या स्वदेशी बनावटीच्या नाहीत; त्या विदेशी बनावटीच्या आहेत. मला वाटतं ८-१० राउंड फायरिंग झाली. सोशल मीडियावरून मला कळलं की गोल्डी ब्रारने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे पण ते अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही. पोलीस जेव्हा याबद्दल माहिती देतील, तेव्हाच त्याबद्दल अधिक बोलता येईल.”
खुशबू पाटनीच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं जगदीश पाटनी यांनी म्हटलंय. “माझ्या मुलीच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आम्ही सनातन धर्म मानतो. आम्ही आचार्य, गुरूजी, साधु-संतांचा आदर करतो. कोणी जर खुशबूच्या वक्तव्याचा विपर्यास करून ते चुकीच्या पद्धतीने दाखवून असं करत असेल तर हा आमच्याविरोधातला कट आहे,” असं जगदीश पाटनी म्हणाले.
पाहा व्हिडीओ –
“हे उत्तर प्रदेश योगीजींचं राज्य आहे. अशा प्रकारच्या गुंडगिरीला पूर्णपणे आळा घातला पाहिजे. गोळीबाराने आम्ही सर्वजण घाबरलो होतो. मीही झोपेतून जागा झालो. मीही बाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण नंतर कसे तरी आडोशाला उभे राहून जीव वाचवला. ८-१० राउंड गोळीबार करण्यात आला,” असं जगदीश पाटनी म्हणाले.