Disha Salian Father Lawyer Disha Salian सीबीआयने सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांत सिंगचा मृत्यू ही आत्महत्या होती असं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिन चिटही दिली आहे. दरम्यान दिशा सालियनच्या वकिलांनी या क्लोजर रिपोर्टबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले दिशा सालियनचे वडील?

“कायद्यानुसार या क्लोजर रिपोर्टला काहीही व्हॅल्यू नाही. त्याचा दुसऱ्या केसवर काही परिणाम होणार नाही. आरुशी हत्या प्रकरण आणि इतर हत्या प्रकरणांमध्येही क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने मान्य केला नव्हता. दिशा सालियन केसमध्ये योग्य न्याय मिळेल.” असं निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.

दिशा सालियन प्रकरणाबाबत काय म्हणाले ओझा?

निलेश ओझा म्हणाले, दिशा सालियन प्रकरणात एसआयटीकडून उशीर होतो आहे. आरोपीबाबत पुरावे आहेत, शिवाय आणखी पुरावे समोर येतील. मोबाइल टॉवर लोकेशन आणि इतर पुरावे हाती येतील. आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. आदित्य ठाकरेंच्या विरोधातही ठोस पुरावे आहेत. असं ओझा यांनी म्हटलं आहे.

दिशाच्या वडिलांनी प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे-ओझा

निलेश ओझा हे दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची बाजू मांडत आहेत. सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणात नव्याने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसंच या प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी केली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. बॉम्बे हायकोर्टात या प्रकरणात २ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दिशा सालियनचं मृत्यू प्रकरण २०२० मध्ये चर्चेत आलं होतं.

दिशा सालियनचं मृत्यू प्रकरण काय?

दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० या दिवशी झाला. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी ही घटना घडली. दरम्यान आदित्य ठाकरे यांचं नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मागच्या पाच वर्षांपासून माझी बदनामी सुरु आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तर दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला भेट दिली. त्यावेळी मला तर वाटलं होतं की नागपूरच्या अधिवेशनातच हा विषय येईल. कारण अधिवेशन आलं की आदित्यचा विषय निघतो असं म्हटलं होतं. आता दिशाच्या वडिलांनी सुशांत सिंग राजपूतच्या क्लोजर रिपोर्टचा काहीही परिणाम होणार नाही असं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha salian father lawyer said cbi closure report in sushant rajput case no legal value scj