Disha Patani UP home firing : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या घराबाहेर गुरुवारी रात्री (११ सप्टेंबर) उशिरा गोळीबार करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बरेलीतील सिव्हिल लाईन्स येथे ही घटना घडली. रोहित गोदारा गोल्डी ब्रार गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या कथित अपमानानंतर दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबार झाला, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा पाटनीच्या घराबाहेर पहाटे ४:३० वाजता दोन वेळा हवेत गोळीबार झाला. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.

गोळीबाराच्या घटनेनंतर लगेचच हिंदीमध्ये लिहिलेली एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये दिशा व खुशबू पाटनीच्या घरावर झालेल्या जबाबदारी स्वीकारण्यात आली. तसेच हा हल्ला आपण घडवून आणला आहे, असा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

रोहित गोदारा गोल्डी ब्रार नावाच्या फेसबुक अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय,

“जय श्री राम
मी वीरेंद्र चारण, महेंद्र सारण (डेलाणा) आज खुशबू पटानी/दिशा पटानीच्या (बॉलीवुड अभिनेत्री) घरावर (व्हिला नंबर 40, सिव्हिल लाइन्स बरेली, यू.पी.) गोळीबार झाला, तो आम्ही करायला लावला. तिने आमचे संत प्रेमानंदजी महाराज व अनिरुद्धाचार्य जी महाराज यांचा अपमान केला होता. तिने आपल्या सनातन धर्माचा अवमान करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या पूज्य देवी देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर तिने किंवा इतर कोणी आपल्या धर्माबद्दल अपमानास्पद कृत्य केले तर त्यांच्या घरातील कोणालाही जिवंत सोडणार नाही. हा मेसेज फक्त तिच्यासाठी नाही तर चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांसाठी आणि तिच्याशी संबंधित लोकांसाठी आहे. भविष्यात जर कोणी आमचा धर्म किंवा संतांबद्दल असे कोणतेही अपमानजनक कृत्य केले तर त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहा. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाण्यास तयार आहोत. आम्ही कधीच मागे हटणार नाही. आमच्यासाठी धर्म आणि संपूर्ण समाज नेहमीच एक असून त्यांचे रक्षण करणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे.”

दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याबद्दल व्हायरल होणारी पोस्ट (सौजन्य सोशल मीडिया)

दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सोशल मीडिया पोस्टची सत्यता पडताळली जात आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.