हा अभिनेता वडिलांचा विरोध पत्करून अभिनयक्षेत्रात आला होता. त्याच्या या निर्णयामुळे वडील इतके नाराज झाले की ते त्याच्याशी २० वर्षे बोलले नाही. ज्या अभिनेत्यामुळे त्याला या क्षेत्रात यायची प्रेरणा मिळाली, त्यानेच नंतर मध्यस्थी करून या दोघांमधील नाराजी दूर केली होती. या अभिनेत्याची पत्नीदेखील लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आहे.
या अभिनेत्याचं नाव म्हणजे अंगद बेदी. तो दिवंगत माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. अगंद बेदीचे वडील बिशन सिंग बेदी २२ कसोटी सामन्यात भारताचे कर्णधार होते. अंगदने सिनेविश्वात यायचं ठरवल्यावर सुरुवातीची सात वर्षे त्याला कामासाठी खूप संघर्ष करावा लागला, नंतर त्याला यश मिळालं.
अंगद बेदी आता त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जात असला, तरी त्याच्यासाठी इंडस्ट्रीत येण्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अंगद बेदीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होतं की, १७ व्या वर्षी त्याला समजलं होतं की त्याला अभिनेता व्हायचं आहे. तो अमिताभ बच्चन यांचे चित्रपट बघत मोठा झाला आणि अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहून त्यांना खूप काही शिकायला मिळालं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्याने इंडस्ट्रीत यायचं ठरवलं.
२० वर्षे बोलले नव्हते वडील
अंगदला अभिनयक्षेत्रात यायचं होतं, पण त्याचे वडील या निर्णयाबाबत खूश नव्हते. त्यांना अंगदचा राग आला आणि ते तब्बल २० वर्षे त्याच्याशी बोलले नव्हते. अंगद अभिनेता झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी मध्यस्थी करून या पिता-पुत्रादरम्यानची नाराजी संपवली. अंगद अभिनय क्षेत्रात चांगलं काम करू लागला.
अंगदच्या करिअरची सुरुवात
करिअरच्या सुरुवातीला अंगदने एक्स्ट्रा इनिंग्स T20 (IPL शी संबंधित क्रिकेट शो) या टीव्ही शोचा होस्ट म्हणून काम केलं. २०११ मध्ये ‘काया तरन’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. २०१७ मध्ये तो ओटीटीकडे वळला आणि तिथेही आपलं नशीब आजमावलं. तो इनसाइड एज या वेब सीरिजमध्येही झळकला होता. या सीरिजमध्ये त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. प्रेक्षकांनाही त्याचं काम आवडलं आणि समीक्षकांनीही उत्तम अभिनयासाठी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
अंगदने केलेले चित्रपट
अंगद बेदीने आपल्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. पण काही चित्रपटांतील त्याच्या भूमिका लोकांना खूप आवडल्या. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत त्याने ‘फालतू’ (२०११), ‘उंगली’ (२०१४), ‘पिंक’ (२०१६), ‘डिअर जिंदगी’ (२०१६), ‘सूरमा’ (२०१८), ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’, ‘लस्ट स्टोरीज २’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अंगदने नेहा धुपियाशी केलंय लग्न
अंगद बेदीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याने अभिनेत्री नेहा धुपियाशी २०१८ मध्ये लग्न केले. नेहा धुपिया देखील इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. या जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd