Genelia Deshmukh John Abraham : अभिनेत्री जिनिलीया डिसुझाने २०११ मध्ये ‘फोर्स’ चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर जॉन अब्राहम होता. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तिचे आणि जॉन अब्राहमचे चुकून लग्न झाले होते, अशा चर्चा होत आहेत. आता जिनिलीयाने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. सेटवर एका दृश्यादरम्यान दोघांचं खरंच लग्न झालं होतं. दोघांनी एकमेकांना हार घातले, तसेच खऱ्या पुजाऱ्याच्या उपस्थितीत सात फेरे घेतले होते, अशा अफवा पसरल्या होत्या.

आता सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने या अफवेबद्दल स्पष्टीकरण दिलं. “त्या अफवेत काहीही तथ्य नव्हते. आम्ही लग्न केलं नव्हते. या सगळ्या गोष्टी पीआरने पसरवल्या होत्या. मला वाटतं की तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे, की त्यांनी असं का केलं,” असं जिनीलीया म्हणाली. तसेच या सर्व गोष्टी निव्वळ अफवा असल्याचं तिने म्हटलं.

तिचा किंवा जॉनचा या चर्चेशी काहीही संबंध नाही आणि हे सगळं पब्लिसिटीसाठी पसरवलं गेलं, असं जिनिलीयाने सांगितलं. जिनिलीयाने अभिनेता रितेश देशमुखशी २०१२ मध्ये लग्न केलं. दोघेही आनंदाने संसार करत आहेत, या जोडप्याला दोन मुलं आहेत. तर जॉन अब्राहमने बिपाशा बासूशी ब्रेकअप झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकर प्रिया रुंचालशी लग्न केलं आहे.

अभिषेक बच्चनने ऐश्वर्याबद्दल घरी सांगितल्यावर अमिताभ बच्चन म्हणालेले, “आम्हाला काय देणं-घेणं…”

लग्नानंतरच्या ब्रेकबद्दल जिनिलीया म्हणाली…

लग्नानंतर चित्रपटांपासून जिनिलीयाने जवळपास दशकभराचा ब्रेक घेतला, त्यावर मत व्यक्त केलं. “बरेच लोक मला विचारतात की १० वर्षे लाइमलाइटपासून दूर राहणं सोपं आहे का? त्यावर मी म्हणते, ‘मला ते करायचं होतं, म्हणून मी केलं.’ मी आनंदी आहे. मी आता कदाचित १० चित्रपट करू शकणार नाही, कदाचित फक्त तीन चित्रपट करू शकेन, पण आता माझा आनंद त्यात आहे आणि तोच सर्वात महत्त्वाचा आहे,” असं जिनिलीया म्हणाली.

या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा

जिनिलियाने २०२२ मध्ये रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. मधल्या काळात तिने ‘जय हो’ आणि ‘फोर्स २’ मध्ये काही छोटे छोटे कॅमिओ केले होते, तर ‘वेड’ या मराठी चित्रपटात तिने मुख्य भूमिका केली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट होता. जिनिलीया लवकरच ‘सितारे जमीन पर’मध्ये आमिर खानबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.