Govinda Apologized For Wife Statement : बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्या नातेसंबंधाबद्दल अनेक दिवसांपासून विविध अफवा उठत आहेत. अर्थात, या अफवा चुकीचं असल्याचं दोघांनीही सांगितलं आहे. पण, या अफवा आणि गोविंदाबद्दल पत्नी सुनीतानं काही मुलाखतींत काही गोष्टी म्हटल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या नात्याबाबत प्रश्न निर्माण होतात.
अशातच अलीकडच्या मुलाखतीत, गोविंदाची पत्नी सुनीतानं पंडित मुकेश शुक्ला यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल आता गोविंदाला माफी मागावी लागली आहे. गोविंदा अनेक वर्षांपासून पंडित मुकेश शुक्ला यांच्या सल्ला घेत आहे. मात्र, आता सुनीतानं त्यांच्याबद्दल चुकीची टिप्पणी केली आहे, ज्यावर प्रतिक्रिया देत गोविंदानं व्हिडीओद्वारे जाहीर माफी मागितली आहे.
व्हिडीओमध्ये गोविंदानं माझ्या पत्नीनं पॉडकास्टमध्ये पंडित मुकेश शुक्ला यांच्याबद्दल अपमानकारक टिप्पणी केली आहे. त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो, असं म्हटलंय. मुकेश शुक्ला आणि त्यांचा परिवार कठीण काळात माझ्याबरोबर होते आणि मी त्यांचा खूप आदर करतो, असंही गोविंदानं सांगितलंय.
व्हिडीओमध्ये गोविंदा म्हणाला, “पंडित मुकेश शुक्ला हे योग्य, प्रामाणिक, गुणी आणि यज्ञ-विधी यांचं ज्ञान असलेले आहेत. त्यांच्या वडिलांमुळे आमचा परिवार कायम एकत्र राहिला. माझ्या पत्नीनं त्यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीबद्दल मी माफी मागतो. मी त्याचं समर्थन करीत नाही. कठीण काळात मला तुमची मदत झाली आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाला तुमची कायम साथ मिळत राहो.”
सुनीता आहुजानं केलेल्या वक्तव्याची गोविंदानं मागितली माफी
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानं नेमकं काय म्हटलं होतं?
सुनीता आहुजानं पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये पंडित मुकेश शुक्ला यांच्याबद्दल नकारात्मक टिप्पणी केली होती. ती म्हणाली होती, “आमच्या घरीपण एक पुजारी आहे, गोविंदाचा पुजारी. तोही असाच आहे – पूजा करायला बोलावतात आणि दोन लाख रुपये मागतात. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही स्वतः प्रार्थना करा, त्यांनी केलेली पूजा काही कामाची नाही. देव त्याच प्रार्थना ऐकतो, ज्या तुम्ही स्वतः करता.”
पुढे सुनीतानं, “ते त्याला मूर्ख बनवतात आणि वाईट सल्ला देतात. मी सत्य बोलते म्हणून त्यांना मी आवडत नाही. माझ्याबद्दल सर्व जण गोविंदाचे कान भरत राहतात आणि तो सगळ्यांवर विश्वास ठेवतो. मी त्यांना सांगू इच्छिते की, जर काही बोलायचं असेल, तर माझ्यासमोर बोला; त्याच्याकडे नाही.”
पॉडकास्टवर सर्वाधिक चर्चा गोविंदा यांच्या कथित अफेअरबद्दल झाली. पारस जेव्हा याबद्दल बोलले, तेव्हा सुनीताने सांगितले, “मी मीडियामध्ये अनेक वेळा सांगितले आहे की, मी हे सर्व ऐकले आहे; पण मी ते आपल्या डोळ्यांनी पाहिले नाही किंवा रंगेहाथ पकडले नाही. त्यामुळे मी काही ठरवून सांगू शकत नाही. पण मी ऐकलं आहे की, ती एक मराठी अभिनेत्री आहे. गोविंदानं आपल्या मुलीबद्दल विचार करायला हवा. त्यानं मुलगी आणि मुलाच्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे.”
