Govinda Says He Was Defamed For Being Late On Sets : गोविंदा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने त्याच्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेता त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अशातच त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंदाने काजोल व ट्विंकल यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमात हजेरी लावलेली. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि व्यावसायिक आयुष्याबद्दलही सांगितलं. कार्यक्रमात गोविंदाने त्याच्या पत्नीबद्दल व घटस्फोटाच्या अफवांबद्दलही सांगितलं.

मला बदनाम केलं गेलं – गोविंदा

गोविंदाने यावेळी त्याच्याबद्दल लोक तो सेटवर उशिरा यायचा अशा चर्चा करत त्याला बदनाम केलं असंही म्हटलं आहे. याबद्दल अभिनेता म्हणाला, “मी सेटवर उशिरा जातो म्हणून मला बदनाम केलं गेलं. मग मी म्हटलं, कोणामध्ये एवढी ताकद आहे का की तो दिवसाला पाच शिफ्ट करून वेळेवर जाऊ शकेल.”

गोविंदा याबद्दल पुढे म्हणाला, “हे शक्यच नाहीये. होऊच शकत नाही. इतकं शूटिंग कसं करू शकतं एखादा माणूस. इकडे तर एका चित्रपटातच थकतात लोक.” याबद्दल गोविंदाने असंही सांगितलं की, काही वेळा गोष्टी त्याच्या हाताबाहेर होत्या, जसं की ट्रॅफिक, वेळापत्रक आणि इतर गोष्टी; ज्यामुळेही त्याला उशीर व्हायचा, पण याबद्दल अनेकदा बातम्या यायच्या. लोक खूप चर्चा करायचे. त्याने असंही म्हटलं की, उलट एका व्यक्तीची बदनामी करण्यापेक्षा बॉलीवूडमधील लोकांनी त्याचा आदर केला पाहिजे.

लोकप्रिय अभिनेता रजत बेदीनेसुद्धा गोविंदाच्या सेटवर उशिरा येण्याबद्दल बोलत संजय दत्तचा एक किस्सा सांगितलेला. सिद्धार्थ कन्नला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणालेला की, “जोडी नं १च्या सेटवर संजय दत्त खूप रागावलेला. त्याने डेविड धवनला पूर्ण सीन बदलायला सांगितलेला. गोविंदासाठी ८ तास थांबूनही तो आला नव्हता. त्यांना तेव्हा कळलं की गोविंदा त्याच्या घरीसुद्धा नाहीये तर थेट हैदराबादहून सेटवर येणार होता. याबद्दल कोणालाही काही माहिती नव्हती. गोविंदा कधी येणार आहे याची माहिती कोणालाच नव्हती, कारण तेव्हा तो दिवसाला ४-५ शिफ्टमध्ये काम करायचा.”