७० व ८० च्या दशकातील या आघाडीच्या अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. दोन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित या अभिनेत्रीला करिअरमध्ये खूप यश मिळालं. पण वैयक्तिक आयुष्य मात्र तेवढ्याच चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. या अभिनेत्रीने दोन लग्ने केली, पण दोन्ही नाती टिकली नाही. ही अभिनेत्री म्हणजे राखी गुलजार होय.

राखी यांनी ‘कभी कभी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘काला पत्थर’, ‘बरसात की एक रात’, ‘राम लखन’ व ‘करण अर्जुन’सारखे चित्रपट केले. ७८ वर्षांच्या राखी आता फिल्म इंडस्ट्रीपासून दूर शांततेत आयुष्य जगत आहेत.

राखी यांनी बंगाली चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार अजय बिस्वासशी पहिलं लग्न केलं होतं. हे अरेंज मॅरेज होतं. खूप कमी वयात त्यांचं लग्न झालं होतं, पण लग्नानंतर २ वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर राखी चित्रपटांमध्ये काम करू लागल्या. २० व्या वर्षी त्यांनी बंगाली चित्रपट साइन केला. काही वर्षांनी त्यांना यश मिळू लागलं. तेव्हा राखी यांच्या आयुष्यात गीतकार गुलजार आले. गुलजार राखीपेक्षा ११ वर्षांनी मोठे होते. गुलजार यांनी लग्नासाठी मागणी घातल्यावर राखीने होकार दिला आणि करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना लग्न केलं.

काश्मीरमध्ये काय घडलं होतं?

१९७३ साली राखी व गुलजार यांचं लग्न झालं. लग्नानंतर राखी अभिनय सोडून संसारात रमल्या. त्यांना एक मुलगी मेघना झाली. पण एका घटनेनंतर राखी व गुलजार यांच्यात बिनसलं. १९७५ मध्ये ‘आंधी’ सिनेमाचं काश्मीरमध्ये शूटिंग सुरू होतं. यादरम्यान संजीव कुमार व सुचित्रा सेनसह संपूर्ण टीम रात्रभर पार्टी करत होती. सुचित्रा खोलीकडे जाताना नशेत असलेल्या संजीव कुमारनी तिचा हात पडकला. परिस्थिती पाहता गुलजार तिथे पोहोचले आणि त्यांनी सुचित्राचा हात सोडवला.

गुलजार व राखी

रागात सुचित्रा खोलीत गेली. पाठोपाठ गुलजारही गेले. दोघेही तिच्या खोलीत दोन तास बोलत होते. गुलजार सुचित्राच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा राखी तिथे रागात उभ्या होत्या. गुलजार व सुचित्रावर राखी यांना संशय आला आणि त्यांनी पतीला त्याबद्दल विचारलं. यामुळे रागावलेल्या गुलजार यांनी राखीवर हात उचलल्याचं म्हटलं जातं. या प्रसंगाची कोणीच पुष्टी केली नाही, पण इंडस्ट्रीत मात्र याबद्दल खूप चर्चा झाली.

राखी गुलजार मागील २२ वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहेत. त्या ७८ वर्षांच्या आहेत. राखी सध्या पनवेलमधील फार्महाऊसमध्ये राहतात. राखी गुलजारकडे ३२ गायी, कुत्रे आणि मांजरी आहेत आणि त्या स्वतः शेती करतात आणि प्राण्यांची काळजी घेतात, असं वृत्त द क्विंटने दिलं आहे.