Hansal Mehta criticizes Mumbai’s broken infrastructure : हंसल मेहता बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. ते नेहमी स्पष्टपणे त्यांची मतं मांडत असतात. अशातच आता त्यांनी मुंबईतील वाढता कचरा, प्रदूषण, एकूणच येथील राहणीमानाची पद्धत यांबाबत सोशल मीडियावर पोस्ट करीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हंसल मेहता यांनी ‘एक्स’वर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नुकतंच परदेशातून शूटिंग संपवून मुंबईत परतल्यानंतर त्यांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टमधून ते म्हणाले, “मी नुकताच कोलंबोहून परतलो आहे. हा एक असा देश आहे जिथे अलीकडेच मोठा आर्थिक आणि राजकीय गोंधळ झाला होता. तरीसुद्धा त्या देशाची राजधानी आपल्यासारख्या महाशक्तीच्या आर्थिक राजधानीपेक्षा स्वच्छ, नीटनेटकी व चांगली आहे”.

हंसल मेहता यांनी व्यक्त केला संताप

दिग्दर्शक पुढे म्हणाले, “जेव्हा जेव्हा मी परदेशातून परत येतो तेव्हा मला अशीच अस्वच्छता दिसते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण- आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे. हे खरं असलं तरी आपल्याकडे अशा लोकांची संख्यासुद्धा अधिक आहे, ज्यांना फार मोठ्या गोष्टींची अपेक्षा ठेवायची नाही. चुकीच्या गोष्टींविरुद्ध काही बोलायचं नाही, अशी शिकवण दिली जाते.”

मुंबईबद्दल बोलताना हंसल मेहता पुढे म्हणाले, “आपण अशा शहरात राहतो जिथे घर घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. इथले रिअल इस्टेटच्या किमती इतक्या जास्त आहेत की, त्यासाठी लोकांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो आणि त्या बदल्यात काय मिळतं? कचरा भरलेले रस्ते, गटारं आणि एक अशी नागरी व्यवस्था, जी केवळ नावालाच आहे. हे शहर केवळ भौतिक वस्तूंनी झपाटून गेलेलं असून आतून पोखरलेलं आहे. आपण असं किती काळ जगत राहणार? थकलेले, उदासीन, आणि सगळं सहन करून त्याचाच अभिमान बाळगणारे म्हणून.”

हंसल मेहता पुढे म्हणाले, “माझं या शहरावर प्रेम आहे. या शहरानं मला सगळं काही दिलं आहे. परंतु, सत्तेत असलेल्या लोकांमुळे या शहराचा श्वास कोंडला आहे. ते त्यांचा फायदा करून घेत आहेत. त्यांना लोकांची पर्वा नाहीये.” हंसल मेहता यांच्या या पोस्टखाली काही नेटकऱ्यांनीसुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हंसल मेहता यांची पोस्ट

पोस्टखाली एकाने “तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख केलात, समस्यांबद्दल बोललात त्या दीर्घकाळापासून सुरू आहेत;; पण यामध्ये काहीही बदल झालेला नाही. भ्रष्टाचार अजूनही सुरू आहे.” दुसऱ्याने “भारतात कोणालाही नागरी व्यवस्थेबद्दल फार माहिती नाहीये. येथे कोणालाही कायद्याची भीती नाहीये”, असे म्हटले आहे.