Hema Malini comment on Dharmendra first wife Prakash Kaur: धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये अभिनेत्री हेमा मालिनींशी दुसरं लग्न केलं होतं. त्यावेळी धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि त्यांना ४ अपत्ये होती. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती होती, पण त्यांनी याबद्दल बोलणं टाळलं. धर्मेंद्र यांना हेमा मालिनींपासून दोन मुली झाल्या. धर्मेंद्र यांनी आपली दोन्ही कुटुंबे वेगळी ठेवली. हेमा यांच्या मुली ईशा व अहाना सनी व बॉबी यांना कधीतरी भेटतात. पण हेमा व प्रकाश कौर या आयुष्यात फार कमी वेळा भेटल्या आहेत.

काही विषय सार्वजनिकरित्या चर्चा करण्यासाठी नसतात, असं हेमा यांनी ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या आत्मचरित्रात प्रकाश कौर यांच्याबद्दल लिहिलंय. लग्नाला ४५ वर्षे झाली आहेत, पण हेमा मालिनी कधीच धर्मेंद्र यांच्या घरी गेल्या नाही. दोघांचेही जुहूमधील बंगले फक्त काही मीटर अंतरावर आहेत. धर्मेंद्र यांचे भाऊ अजित जेव्हा आजारी होते, तेव्हा ईशा देओल तिच्या वडिलांच्या मूळ घरी गेली होती. ३० वर्षांत पहिल्यांदाच ती त्यांच्या घरी गेली होती, तेव्हा ती पहिल्यांदा सावत्र आई प्रकाश कौर यांना भेटली होती. “मी त्यांच्या पाया पडले, त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मी निघून आले,” असं ईशा म्हणाली होती.

धर्मेंद्र व हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा धर्मेंद्रच्या आई-वडिलांबद्दल आलेला अनुभव त्यांनी सांगितला होता. “धर्मेंद्रची आई सतवंत कौरही खूप प्रेमळ आणि दयाळू होत्या. मी गरोदर असताना त्या एकदा जुहू येथील एका डबिंग स्टुडिओमध्ये मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी घरात कोणालाही सांगितलं नव्हतं. मी त्यांच्या पाया पडले, त्यांनी मला मिठी मारली आणि नेहमी खूश राहा असे आशीर्वाद दिले होते,” असं हेमा म्हणाल्या होत्या.

मी प्रकाश कौरबद्दल कधीच… – हेमा मालिनी

धर्मेंद्र यांचे दोन कुटुंबातील गुंतागुंतीबद्दल हेमा यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. “मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. धरमजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केले त्याबद्दल मी आनंदी आहे. त्यांनी सामान्य वडिलांप्रमाणे वडिलांची भूमिका बजावली. मी काम करते, माझे आयुष्य मी कला व संस्कृतीसाठी समर्पित केले आहे. मला वाटतं की जर परिस्थिती यापेक्षा थोडी वेगळी असती तर मी आज जशी आहे तशी नसते. मी प्रकाश कौरबद्दल कधीच बोलले नसले तरी मी त्यांचा खूप आदर करते. माझ्या मुलीही धरमजींच्या कुटुंबाचा आदर करतात. जगाला माझ्या आयुष्याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण आमचं आयुष्य लोकांसाठी नाही,” असं त्या म्हणाल्या होत्या.

ईशा देओल चौथीत असताना आईने तिने तिला वडिलांच्या पहिल्या लग्नाबद्दल व मुलांबद्दल सांगितलं होतं. ईशाला शाळेत कोणीतरी दोन आई असलेली मुलगी म्हणत चिडवलं होतं. “तेव्हा मला समजलं की माझ्या आईने अशा व्यक्तीशी लग्न केलंय, ज्यांचं आधीच एक लग्न झालंय आणि त्यांचं एक कुटुंबही आहे. पण मला या गोष्टीचं कधीच वाईट वाटलं नाही. मला त्यात काही चुकीचं वाटत नाही,” असं ईशा देओल म्हणाली होती.